जिवंत वीजताराचा स्पर्श झाल्याने गवंडी कामगाराचा मृत्यू

वर्धा : १७ फेब्रुवारी – वन्यप्राण्यांपासून पिकांच्या सरंक्षणार्थ शेतात लावलेल्या जिवंत विजताराला स्पर्श झाल्याने गवंडी कामगार असलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज झडशीच्या मौजा खैरी शेतशिवारात सकाळी ७ वाजता उजेडात आली. हरिदास नामदेवराव काळे (वय४१) रा. झडशी असे मृतकाचे नाव आहे.
महावितरणकडून शेतकर्यांना दिवसा ऐवजी रात्रीचा विज पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात रात्रभर जागली करतात. जागली करताना त्यांच्या जिवीताला सदैव धोका असतो. परंतु हे आजपयर्ंत निगरगट्ट शासनाला व महावितरणच्या अधिकार्यांना कळले नाही ही एक शोकांतिका आहे. याच निर्दयी व्यवस्थेने झडशीच्या गवंडी कामगार असलेल्या तरुण शेतकर्याचा नाहक बळी घेतला. मृतक हरिदास हा गवंडी कामासह बटईने शेती व्यवसाय करायचा. मौजा खैरी शिवारात त्याने बटईने शेती केली होती. काल सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो मुक्कामाच्या उद्देशाने शेतात जागली गेला होता. शेतशिवारातील विज पुरवठा हा रात्री ११ वाजतानंतर सुरू होत असल्याने त्याला करंट लागल्याची घटना ही रात्री अकरानंतर घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह मृतावस्थेत शेजारच्या शेतकर्यांना दिसला. वन्यप्राणी उभ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतात विजपुरवठा सोडला होता. परंतु महावितरणच्या शेतकर्यांना दिवसाऐवजी रात्री विज पूरवठा करण्याच्या धोरणामुळे आज हरिदासला आपला जीव गमवावा लागला. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांकडून पीएसआय कंगाले, विजय कापसे, रविंद्र रघाटाटे, वणवे व गजानन वाट यांनी घटनास्थळी जात घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply