हरीणाचे मांस व दोन कासवांसह एका आरोपीला अटक

नागपूर : १६ फेब्रुवारी – नागपूर जिल्ह्याच्या खापा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या खापा सर्कलमधील डोगेंघाट परिसरात वन्यप्राण्यांची मांस विक्री केली जाणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर रात्री उशिरा वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत हरीणाचे मांस जप्त केले आहे. याशिवाय आरोपींनी अवैधरित्या बाळगलेले कासव सुद्धा जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
वन विभागाकडून अवैध कासव बाळगणे आणि वन्य प्राण्यांच्या मांस विक्री प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील आरोपी सुरेश शेंडे यांच्या घरी ही कारवाई झाली आहे. वनविभागाने शेंडे यांच्या घरातून 3 कासव जप्त केले आहेत, तर लखन मुरलीधर तुमाने यांच्या घराच्या परिसराजवळ हरीणाचे मांस आढळून आले आहे. वन विभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
वन विभागाचं पथक खापा येथे पुरावे संकलन करीता गेले होते. यावेळी श्वान पथकच्या मदतीने पुरावे संकलन करण्यात आले. दोन्ही वन गुन्ह्यातील संशयित आरोपींचा वनकर्मचारी व राज्य राखीव पोलीस दल कसून शोध घेत आहे. मात्र एक आरोपी वन विभागाच्या हाती लागला आहे. आरोपीला प्रथम श्रेणी न्यायालय, सावनेर यांनी 2 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

Leave a Reply