चंद्रपूमध्ये इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उभारणार १०५ मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प

चंद्रपूर : १६ फेब्रुवारी – चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प व भद्रावती तालुक्यातील कचराळा व गुंजाळा येथे ५६९.६८ कोटी खर्च करून १४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या एक ते दिड वर्षात हे दोन्ही प्रकल्प उभे राहणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रपूर वीज केंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १०५ मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच पाण्याची खोली मोजण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कामाचे क्षेत्र ३.२० चौरस किलोमीटर आहे.विशेष म्हणजे हा प्रकल्प पाण्यावर होत असल्याने जमिनीची बचत होणार आहे. सोबत फ्लोटिंग सोलरमुळे बाष्पीभवन होणार नाही आणि पर्यायाने पाण्याची बचत होईल. या प्रकल्पाशी निगडीत इतर स्थापत्य बांधकामासाठी जमीन आणि पाण्याची चाचणी व्हीएनआयटी या नामांकित संस्थेकडून करण्यात आली आहे.
चंद्रपूर वीज केंद्रालगत कचराळा येथील प्रस्तावित १४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भद्रावती तालुक्यातील गुंजाळा व कचराळा भद्रावती येथे अनुक्रमे ६७.१९ हेक्टर व २०० हेक्टर जमीन अशी एकूण २६७.१९ हेक्टर जमीन लागणार आहे. सदर प्रकल्पाचा अंदाजित खर्च रुपये ५६९.६८ कोटी आहे. जमीन महानिर्मितीने पूर्वीच संपादित केली असून ही जागा पडीक असल्याने प्रकल्पासाठी वापर करण्यात येणार आहे. १४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये ‘क्रिस्टलाईन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
सौर ऊर्जा प्रकल्प हे पर्यावरणपूरक असल्याने महानिर्मितीने प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे राज्याचे ऊर्जांमंत्री नितीन राऊत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीसाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याची माहिती चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी दिली. २५० मेगावॅटच्या या सौर प्रकल्पामुळे कोळशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. चंद्रपूर वीज केंद्रालगत राष्ट्रवादी कॉग्रेस नगरच्या बाजूला ५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही प्रक्रिया सध्या प्राथमिक स्तरावर आहे. सध्या यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

Leave a Reply