मित्रांसोबत कारमध्ये फिरत असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अकोला : १५ फेब्रुवारी – कामानिमित्त मित्रांसोबत कारमधून जात असताना मागच्या सीटवर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अकोल्यात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या सीटवर आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याचा थांगपत्ता देखील संबंधित तरुणांना लागला नाही. संबंधित तरुण आपल्या मृत मित्राला घेऊन रात्रभर तसेच फिरले आहेत. अखेर पोलिसांनी त्यांची गाडी अडवून तपास केला असता, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सुनील उकरडे असं मृत पावलेल्या ४८ वर्षीय मृताचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुनील हे तेल्हारा येथील रहिवासी असणारे सचिन संभाजी मोरे (३८) आणि खार येथील रहिवासी रवींद्र बोदडे (४७) यांच्यासोबत कामानिमित्त तेल्हाऱ्यावरून अकोल्याच्या दिशेनं येत होते. यावेळी रल्वे स्थानकाजवळ आले असता, एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीला कट मारला. त्यामुळे त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. दरम्यान पाठीमागील सीटवर बसलेल्या सुनील यांचा अचानक मृत्यू झाला.
दरम्यान, रात्री उशिरा सुभाष चौक परिसरात दोन तरुण धिंगाणा घालत असल्याची माहिती रामदास पेठेचे ठाणेदार किशोर शेळके यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी कारची तपासणी केली, दरम्यान कारच्या पाठीमागील सीटवर एक तरुण झोपल्याचे पोलिसांना दिसलं. पोलिसांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही उठला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण सुनील यांचा आधीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

Leave a Reply