पूर्व विदर्भात बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला, मृत्युसंख्येतील वाढ भीतीदायक

नागपुरात ५००७ नवीन बाधित तर ११२ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २ मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप अविरत सुरु असला तरीही मागील काही दिवसात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे. कोरोनाने मृत होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र काही कमी होताना दिसत नाही त्यात वाढच होत आहे. आज पूर्व विदर्भात १०९८९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ८९६५ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पूर्व विदर्भात आज विक्रमी २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात नागपुरात ६३७६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ५००७ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल ११२ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.
रोज येणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रुग्णसंख्या कमी दिसत असली तरीही आज चाचण्यांची संख्याही काही प्रमाणात रोडावलेली दिसत आहे बहुदा त्यामुळेच आज बाधितांची संख्या कमी दिसून येत असावी. गेल्या २४ तासात नागपूर शहरात ५००७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून त्यात २२६९ रुग्ण ग्रामीण मधील २७२४ शहरातील तर १४ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण बाधितांची संख्या आता ४१९३७० वर पोहोचली आहे. शहरात आज मृत्यूने पुन्हा शतक गाठले असून ११२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृत्यूंमध्ये ३६ ग्रामीणमधील, ६२ शहरातील तर १४ इतर जिल्ह्यातील रुग्णांचे आहेत. एकूण मृत्युसंख्या आता ७५९९ वर पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज एकूण १८६२९ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ३३५७ ग्रामीणमध्ये तर १८६२९ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. शहरात सध्या ७४१२७ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील ३१८५१ ग्रामीण भागातील तर ४२२७६ शहरातील रुग्ण आहेत. आज ६३७६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३३७६४४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.५१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Leave a Reply