घ्या समजून राजे हो… – हिजाब प्रकरणात मुस्लिम नेत्यांनी वास्तव स्वीकारणेच हितावह

गेल्या आठवडाभरापासून देशात हिजाबचा विषय प्रचंड गाजतो आहे. हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन्ही बाजूने हिरीरिने बोलण्यासाठी कथित विचारवंत पुढे येत आहेत. समाजमाध्यमांवर वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर हा विषय सतत चघळला जातो आहे. त्यात सर्वात कडी केली आहे ती एमआयएमचे नेते अससुद्दीन ओविसी यांनी. एक दिवस हिजाब घातलेली महिला या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेली असेल असा दावा त्यांनी करुन देशभरात खळबळ उडवून दिली आहे.
हिजाबचा मुद्दा वर आल्यापासून जनसामान्यांना सर्वात पहिला प्रश्‍न पडला तो म्हणजे हिजाबचा नेमका अर्थ काय? मुस्लिमांमध्ये खानदानी महिला बुरखा परिधान करतात हे सर्वांना ज्ञात होते. या निमित्ताने हिजाब ही बुरख्याचीच एक सुधारित आवृत्ती आहे हे आम्हा भारतीयांना कळले. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली.
जाणकारांच्या मते बुरखा किंवा हिजाब ही काही मुस्लिमानी धर्मग्रंथात दिलेली नियमावली किंवा प्रथा नाही. ही मुस्लिम समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीने लादलेली पद्धत आहे हे अनेकदा दाखल्यातून स्पष्ट होते. जुन्या काळात मुस्लिमांमध्ये बळी तो कान पिळी असे प्रकार चालायचे. त्यावेळी एखाद्याची देखणी पत्नी किंवा मुलगी दिसली की तलवारीच्या जोरावर तिला पळवून नेले जायचे. अशावेळी आपली मुलगी किंवा पत्नी इतरांना दिसूच नये यासाठी तिने डोक्यापासून पायापर्यंत सर्वांग झाकणारा अंगरखा म्हणजेच बुरखा किंवा हिजाब परिधान करावा अशी परंपरा सुरु झाल्याचे जाणकार सांगतात. अशावेळी या अंगरख्यात त्या स्त्रीचे फक्त डोळे दिसतील आणि तिलाही डोळ्यांनी समोरचे बघता येईल अशी व्यवस्था त्या बुरखा किंवा हिजाब नामक अंगरख्यात केलेली असायची. त्या स्त्रीला भोजन किंवा पाणी पिणे यासाठी तोंडावरचे आवरण दूर करण्याची परवानगी असायची. ही प्रथा अनेक शतकांपासून चालू होती.
गेल्या 100 वर्षात जगभरात शिक्षणाने सर्वच क्षेत्रात व्यापक प्रगती झाली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील काम करु लागल्या. महिलाही शिकल्या नोकरी करुन घर चालवू लागल्या आणि राजकारण आणि समाजकारणातही समोर आल्या. त्यामुळे या महिलांना कमी लेखणार्‍या प्रथा परंपरा हळूहळू कमी होऊ लागल्या. ज्याप्रमाणे मुस्लिम महिला बुरखा परिधान करायच्या त्याप्रमाणे भारताच्या उत्तर भागात महिला घुंगट घ्यायच्या. घुंगट अशा रीतीने ओढलेला असायचा की त्या महिलेचा चेहरा नीटसा दिसू नये. इकडे मध्यभारत किंवा दक्षिणेकडे देखील महिला डोक्यावरून पदर घ्यायच्या. आता महिला शिकून पुढे आल्या. त्यांनी घुंगट आणि डोक्यावरचा पदर केव्हा खांद्यावर आणला ते कुणालाच कळले नाही. गेल्या 50 वर्षात महिला साडी हा परंपरागत पोषाख बाजूला ठेवून वेगवेगळे ड्रेसेस वापरायला लागल्यापासून तर पदराचाही मुद्दा बाजूला पडला.
हे परिवर्तन जसे हिंदू समाजात झाले तसेच मुस्लिमांमध्येही होत होते. त्यातही हे परिवर्तन फक्त भारतातच नाही तर जगभरात होऊ लागले होते. गत तीन दिवसांपासून मुस्लिम समाजाचे जुन्या भारतातील नेते आणि पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष बॅ. जिना यांचे एका मुस्लिम महिलांच्या घोळक्यातील छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यात बॅ. जिना यांच्या समवेत बसलेल्या महिलांपैकी एकाही महिलेने बुरखा किंवा हिजाब परिधान केलेला नाही. बॅ. जिना यांचे निधन 1948 साली झाले. म्हणजेच त्यापूर्वीचाच हा फोटो होता. त्यावेळीही बुरखा किंवा हिजाबचची सक्ती नव्हती हे स्पष्ट होते. आणखी एक फोटो समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होतो आहे. त्यात आखाती देशातील एका देशाच्या पंतप्रधानाचा त्याच्या पत्नीसह फोटो व्हायरल होतो आहे. हा पंतप्रधान मोहम्मद पैगंबरांचा वंशज असल्याचा दावा केला आहे. त्याची पत्नी स्कर्ट आणि टॉप या पाश्‍चत्या वेषात केस कापून मोकळे सोडलेले अशा अवतारात उभी असून तिने कोणताही बुरखा किंवा हिजाब परिधान केलेला नाही. असे अनेक मान्यवर महिलांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत असून असे असताना हिजाबचा आग्रह का? हा प्रश्‍न उपस्थित केला जातो आहे.
भारतापुरते बोलायचे झाल्यास आज सर्वच क्षेत्रात मुस्लिम महिला आघाडीवर आहेत. त्यातील कोणी बुरखा किंवा हिजाबचा आग्रह कधीच धरला नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास केंद्रात दिर्घकाळ मंत्रीपद भूषविलेल्या नजमा हेपतुल्ला यांचे देता येईल. त्याचप्रमाणे काश्मीरातील नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनाही कधी बुरख्यात बघितले नाही. चित्रपट अभिनेत्री आणि समाजसेविका शबाना आझमी यांचेही उदाहरण देता येईल. चित्रपट क्षेत्रातील जुन्या पिढीतल्या सायराबानो, मुमताज, फरीदा जलाल, सलमा आगा अशी अनेक नावे सांगता येतील. या सर्व महिलांनी बुरखा न परिधान करताही आपले चारित्र्य जपले आणि समाजात मानसन्मानही मिळवला. मग आताच महाविद्यालयात जाणार्‍या मुलींना बुरख्याची किंवा हिजाबजची सक्ती का?असा प्रश्‍न उपस्थित केला जातो आहे.
आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही एकत्र नांदत होते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हिंदूंसाठी हिंदुस्थान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान असे दोन देश करण्यात आलेत. मुसलमानांनी पाकिस्तानात जावे असे अपेक्षति होते. मात्र तत्कालिन राज्यकर्त्यांनी पाकिस्तानात न जावू इच्छिणार्‍या मुस्लिमांनाही भारतात ठेवून घेतले. त्याचपाठोपाठ त्यांनी या मुस्लिमांचे अतिरेकी लाड करण्याचेही धोरण राबवले.
त्या काळात देशातील बहुसंख्य मुस्लिम समाज हा अशिक्षित होता. त्यांच्यावर त्यांचे धार्मिक गुरु म्हणजेच मुल्ला मौलवी इमाम यांच्या विचारांचे वर्चस्व होते. हे मुल्ला मौलवी धर्माचा धाक घालून या अशिक्षित समाजाला आपल्या तालावर हवे तसे नाचवायचे. त्याचा फायदा तत्कालिन काँग्रेस नेतृत्वाने घेतला. मुस्लिमांचे हे धार्मिक नेते असे हिंदू समाजापासून वेगळे असणारे धार्मिक निर्बंध आपल्या समाजावर लादत होते. त्याला राज्यकर्त्यांचा वरदहस्त मिळवून आपले म्हणणे खरे करुन घेत होते. त्याच्या बदल्यात देशातील मुस्लिमांची एक गठ्ठा मते काँग्रेसच्या पारड्यात टाकली जात होती.
मुस्लिम धार्मिक नेते आणि काँग्रेसचे नेते यांच्यातल्या तडजोडीमुळे मुस्लिम समाजावर असे अनेक धार्मिक निर्बंध मुल्ला मौलवीनी लादले. त्याचबरोबर कायद्यातल्या पळवाटा शोधत अनेक सोयी देखील करुन घेतल्या. याच धार्मिक नेत्यांच्या हट्टापायी देशात समान नागरी कायदा लागू होऊ दिला नाही. परिणामी हिंदू, ख्रिस्ती, पारशी, बौद्ध, जैन यांना एक कायदा तर मुस्लिमांसाठी वेगळा कायदा असा प्रकार सुरु झाला.
1988 मध्ये गाजलेल्या शहाबानो खटल्याचा निकाल लागला. या खटल्यात शहाबानो या तलाक पीडित महिलेला न्यायालयाने पोटगी मंजूर केली. हा निकाल येताच मुस्लिम समाज खवळला. त्यांनी आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला येतो आहे अशी ओरड केली. शेवटी तत्कालिन राजीव गांधी सरकार नमले आणि त्यांनी चक्क कायद्यात दुरुस्ती केली. ही दुरुस्ती मुस्लिम महिलांवर अन्याय करणारी होती. मात्र मुल्ला-मौलवींच्या दबावात येऊन सरकारने मुस्लिम महिलांवर कायमचा अन्याय केला.
असाच प्रकार हिजाबच्या बाबतीत होतो आहे. आज देशातील इतर धर्माच्या महिला कुणीही हिजाब सदृश वस्त्र परिधान करुन स्वतःचे अंग झाकून घेत नाहीत. मात्र मुस्लिमांमधील या धार्मिक नेत्यांना स्वतःचे मोठेपण टिकवण्यासाठी असे निर्बंध महिलांवर लादायचे असतात. आज देशातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये गणवेश आवश्यक आहे. तसेच अनेक नोकर्‍यांमध्येही गणवेश आवश्यक आहे. मुस्लिम तरुणी आणि महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आघाडीवर आल्या आहेत. अशावेळी त्यांना हिजाबजची सक्ती करणे कितपत योग्य आहे. या महिला लष्कर, पोलिस, एक्साईज अशा सेवांमध्ये कार्यरत झाल्यास तिथे बुरखा किंवा हिजाब परिधान करुन त्या सेवा देऊ शकतील काय याचा विचार व्हायला हवा. अशावेळी ते रस्ते या मुस्लिम महिलांसाठी कायमचे बंद होतील हा धोका लक्षात घ्यायला हवा. मात्र आमचे धार्मिक नेतृत्व टिकणे महत्वाचे, महिलांचे सबलीकरण नंतर बघू असा या धार्मिक नेत्यांचा हेका आहे हे स्पष्ट दिसते आहे.
त्यातही गेली अनेक वर्ष कुठेही अस्तित्वात नसलेला हा मुद्दा अचानक वर कसा आला याचाही विचार व्हायला हवा. कर्नाटकातील एका गावात काही विद्यार्थिनी शाळेचा गणवेश बाजूला ठेवून अचानक हिजाब परिधान करुन शाळेत पोहोचल्या. शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांना शाळेत येण्यास मनाई केली. त्यावरुन या धार्मिक नेत्यांनी वातावरण पेटवायला सुरुवात केली. सुरुवातीला कर्नाटकच्या एका गावात असलेले हे प्रकरण बघता बघता संपूर्ण देशात पोहोचले किंवा पोहोचवले गेले. या प्रकरणात उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली. हा मजकुर लिहित असताना उच्च न्यायालयाने हिजाब परिधान करण्याचा आग्रह धरता येणार नाही असा अंतरिम आदेश दिला आहे. या मुद्दावर आता सुनावणी आणि निकाल अपेक्षित आहे.
नेमके हे प्रकरण याचवेळी कसे वर आले हा प्रश्‍नही विचारला जाऊ शकतो. या देशात काँग्रेस सरकारने मुस्लिमांचे अवास्तव लाड केले. त्याचा फायदा बहुसंख्य मुस्लिमांना न मिळता फक्त मोजक्याच धार्मिक नेत्यांनी घेतला. त्यातून त्यांना त्यांचे वर्चस्व कायम ठेवायचे होते. मात्र काँग्रेसचे सरकार गेल्यावर नरेंद्र मोदी सरकारने हळूहळू पाश आवळायला सुरुवात केली. ज्या उत्तरप्रदेशात मुस्लिमांचे वर्चस्व होते तिथे मोदींचे सहकारी योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीवर पकड जमवली. कोणत्याही एका समाजाचे लाड होणार नाही याची काळजी घेणे सुरु केले. त्यामुळे हे मुस्लिम धार्मिक नेते दुखावले. मोदी सरकार असेच राहिले तर आपली खैर नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून मग मोदी सरकारला नामोहरम करण्याचे वेगवेगळे खेळ खेळले जाऊ लागले.
आता उत्तरप्रदेशातील निवडणूका तोंडावर आहेत. उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तिथे मुस्लिम समाज लक्षणीय संख्येत आहे. तिथे मुस्लिम मतांचे धृव्रीकरण झाले तर निवडणूक निकाल बदलू शकतो अशी शक्यता वाटल्यामुळे ही खेळी मुस्लिम धर्मामार्तडांनी खेळलेली दिसते आहे. हा हिजाबचा मुद्दा पुढे आणून भारतात आमचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचा कंठशोष करायचा आणि त्यातून मुस्लिम मतांचे धृव्रीकरण करायचे, त्यायोगे भाजप सरकारला धक्का द्यायचा अशीही खेळी आहे. त्यामुळेच अचानक विद्यार्थिनींचा हिजाबचा आग्रह सुरु होतो त्याला सहाजिकच हिंदूंचा विरोध होतो. मग हिजाब घातलेली एक मुस्लिम मुलगी रस्त्याने ‘अल्ला हो अकबर’ चे नारे देत ओरडतांना दाखवतात. तो व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल होतो आणि मग देशभर मुस्लिमांचे आंदोलन सुरु होते. त्याला काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा सक्रिय आशीर्वाद मिळतो. हे सर्व सुनियोजित कट कारस्थान आहे हे स्पष्ट दिसते आहे.
मात्र मतांचे धृव्रीकरण होऊन मुस्लिम मते भाजपच्या विरोधात जातील हे स्वप्न बघणारे मुस्लिम नेते एक बाब विसरतात. ज्या पद्धतीने मुस्लिमांचे धृव्रीकरण होते त्याच पद्धतीने हिंदूंचेही धृव्रीवकरण अशक्य नाही. गेल्या 70 वर्षात झालेल्या अन्यायांमुळे हिंदू समाजही जागृत झाला आहे. त्याला समाज माध्यमांनी प्रचंड हातभारही लावला आहे. ही बाब लक्षात घेता ज्याप्रमाणे मुस्लिमांचे धृवीकरण होईल त्याचप्रमाणे हिंदू मतांचेही धृवीकरण होऊ शकते. आज या देशात हिंदू लक्षणीय संख्येत आहेत. त्यामुळे त्यांचे धृवीकरण झाले तर मुस्लिम धार्मिक नेत्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो. हा धोका त्यांनी लक्षात घ्यायला हवा. आजवर काँग्रेसच्या राज्यात मुस्लिम नेत्यांचे भरपूर लाड झाले. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे आता आपण हवे तसे सरकारला वाकवू शकू या भ्रमात त्यांनी न राहता वास्तव स्वीकारावे इतकेच या ठिकाणी सुचवावेसे वाटते.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply