मोदींना नक्की काय हवंय? – प्रियांका गांधी यांचा सवाल

नवी दिल्ली : ८ फेब्रुवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या भाषणात काँग्रेसवर केलेल्या टीकेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसमुळे करोना पसरल्याचा उल्लेख मोदींनी केल्यानंतर त्यावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदींच्या या विधानावरून निशाणा साधला आहे. प्रियांका गांधी सध्या गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात प्रचार करत असून यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
प्रियांका गांधींनी पणजीमध्ये बोलताना मोदींच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “ज्या लोकांना त्यांनी देवाच्या भरवशावर सोडून दिलं, जेवण नव्हतं, घरी जायचा कोणताही पर्याय नव्हता. पायी चालत जात होते. रस्त्यात मरत होते. त्यांना कुणीही मदत करू नये हे हवं होतं का मोदींना? मोदींना नक्की काय हवंय?”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींसह भाजपाच्या सर्वच बड्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या होत्या. त्यावरून देखील प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला. “त्यांनी ज्या मोठमोठ्या प्रचारसभा घेतल्या त्याचं काय?” असा संतप्त सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.
‘‘करोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन करोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते. तुम्ही (काँग्रेस) लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तुम्ही देशभर करोना पसरवला’’, असा आरोप मोदींनी लोकसभेत बोलताना केला होता.

Leave a Reply