लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून लता मंगेशकर अजरामर आहेत…! – डॉ. नितीन राऊत

नागपूर : ७ फेब्रुवारी – “लता दीदी काल अचानक सोडून गेल्याचे अपार दु:ख आहे. आपल्या स्वरातून त्यांनी देशभक्ती जागविली. सर्वच भाषांमधून सुरेल गाणी गाऊन त्यांनी देशाची एकात्मता व अखंडता टिकविण्यात मोलाची कामगिरी बजावली. संगीत क्षेत्रात त्यांनी एकछत्री राज्य केलं. रणजीतबाबू देशमुख यांचे राजकीय गुरु व माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी. साळवे यांच्याशी त्यांचे नाते बहिणीचे होते. त्यामुळे रणजीतबाबू व त्यांच्या कुटुंबाशी देखील त्यांचा स्नेहभाव होता. रणजीतबाबूंवर व्यक्तिगत लोभ असल्यामुळे लता दीदींनी त्यांच्या नावाने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी त्यांना संमती दिली होती. म्हणूनच ३२ वर्षांपूर्वी लता मंगेशकर हॉस्पिटल या नावाने नागपूर येथे त्यांच्या संस्थेतर्फे भव्य रुग्णालय सुरू करण्यात आले. लता मंगेशकर हॉस्पिटल या नावाने सुरू असलेली जगातील ती एकमेव संस्था आहे व गरजूंसाठी वरदान आहे. हे नामांकित हॉस्पिटल एन.के.पी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडले असल्यामुळे या संस्थेला विशेष महत्व आहे. दैवीय शक्ती लाभलेल्या गानसम्राज्ञी आज आपल्यामध्ये नाहीत, याचे शल्य आहे. परंतु, लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून लता मंगेशकर अजरामर आहेत. राज्य शासनाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो”, असे भावनिक वक्तव्य नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे आदरणीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते. लता दीदींच्या नागपूर भेटीला त्यांनी उजाळा दिला व लता दीदींची सुरेल गाणी गाऊन दाखविली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले,”बाळाच्या काळजाप्रमाणे निर्मळ आवाज लाभलेल्या लता दीदींना लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे जी चांगली सेवा मिळत आहे, तीच खरी श्रद्धांजली आहे. लता मंगेशकर अमर असून या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचे नाव चमकत राहील. स्वर व ताल याचा अचूक मेळ म्हणजे लता दीदी. सरस्वतीच्या रूपाने त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता.”
लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरचे अध्यक्ष व माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख म्हणाले,”आमच्या कुटुंबाशी लता दीदींचा स्नेहभाव होता. आमच्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी होते. त्यांच्या स्मृती चिरंतन करण्यासाठी यापुढेही आम्ही लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत राहू. गरजू रुग्णांना परवडेल अशा पद्धतीने आधुनिक सेवा देऊ. मी व्यक्तिशः तसेच लता मंगेशकर हॉस्पिटलचे व्यवस्थापन, डॉक्टर्स, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
लता मंगेशकर हॉस्पिटलचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख म्हणाले,”परमेश्वरीय देण असलेल्या लता दीदींच्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले. त्या या जगात नाहीत, याचे अपार दु:ख आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलची सेवा भविष्यातसुद्धा समर्पित भावनेने अविरत सुरु राहील.”
सर्वांनी पुष्पचक्र व पुष्प अर्पण करून लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी व्यासपीठावर लता मंगेशकर हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष देशमुख, अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, डॉ. उषा रडके, डॉ. विलास ठोंबरे, डॉ. नितीन देवस्थळे, डॉ. विकास धानोरकर उपस्थित होते. डॉ. ऐश्वर्या यांनी लता दीदींची २ गाणी गायली. श्वेता शेळगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. शिक्षक, डॉक्टर्स, कर्मचारीवृंद व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply