ही लोकशाहीची चांगली बाजू असल्याचे फडणवीस यांना वाटते का? – नाना पटोले यांचा सवाल

नागपूर : ७ फेब्रुवारी – भाजप नेते किरीट सोमैया यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेचा निषेध करत हा लोकशाहीचा खून असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही. पण, ईडीची चौकशी लावू, सीबीआयची चौकशी लावू, असे म्हणत लोकांना धमक्या देणे, ही लोकशाहीची चांगली बाजू असल्याचे फडणवीस यांना वाटते का, असा सवाल उपस्थित केला.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सतत नाना पटोले यांच्यावर टीका करतात. पण, बावनकुळे यांच्या नातलगानेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर नाना पटोले म्हणाले, मी कुठल्याही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, असे म्हणत मी चौकशी अधिकारी नाही, असे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत नाना पाटोले यांना विचारले असता सगळे भाजपवाले आता काँग्रेसमय होत आहेत. सोनिया गांधींना पत्र लिहणे ही चांगली बाब आहे, असे ते म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातले असून यामध्ये काँग्रेसचाच विजय होईल, असाही विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच गोव्यात भाजपची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील निवडणुकीत पराभूत होतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या भाजपला मनोहर पर्रिकरांनी गोव्यात ओळख मिळवून दिली. त्यांच्याच कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले आहे, असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply