संपादकीय संवाद – गानसरस्वतीला अखेरचा दंडवत

गेली ८ दशके जगभरातील संगीतविश्वावर साम्राज्य गाजवणारे ईश्वरी सूर अखेर आज निमालेंले आहेत. ख्यातनाम गायिका गानकोकिळा स्वरसम्राज्ञी म्हणून ओळखल्या गेलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज सकाळी इहलोकीची यात्रा संपवली आहे. या बातमीने फक्त भारताचं नव्हे, तर जगभरातील त्यांचे चाहते सुन्न झालेले आहेत.
लता मंगेशकर यांनी अगदी बालवयापासून गायला सुरुवात केली. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेल्या गायनाच्या देणगीचे त्यांनी आयुष्यभर फक्त चीजच केले. भारतातल्या सर्व भाषांमध्ये त्यांनी हजारो गीते गायलीत. वेगवेगळ्या नायिकांना त्यांनी आपला आवाज दिला. प्रत्येक नायिका तिची भूमिका आणि तिथले कथानक हे समजून घेत त्या गात होत्या, त्यामुळे त्यांचे गाणे हे कायम श्रोत्यांच्या काळजाला भिडायचे. सकाळी उठल्यावर ऐकायची भूपाळी असो, कि रात्री निजतांना ऐकवायचे अंगाई गीत असो, जन्मलेल्या मुलाच्या बारश्याच्या दिवशी गायचा पाळणा असो,की अंत्यसमयी गाण्यातून व्यक्त होणाऱ्या भावना असोत, सर्व प्रसंगांना अनुरूप सर्व प्रकारची गीते, त्यांनी गायली.
त्यामुळे जगभरातल्या करोडो चाहत्यांना त्या आपल्या कुटुंबातली व्यक्तीच वाटत राहिल्या.
राष्ट्रभक्ती ही त्यांच्या नसानसात भिनली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ए मेरे वतन के लोगो, सागरा प्राण तळमळला, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत ही त्यांनी गायिलेली गीते त्यांच्या उत्कट राष्ट्रभक्तीची साक्ष देतात. त्यामुळेच रावांपासून रंकांपर्यंत सर्वांनाच त्या आपल्या वाटत राहिल्या. पूर्वी ज्यावेळी दूरचित्रवाणी नव्हती, त्या काळात सीमेवर देशरक्षणार्थ सज्ज असलेल्या जवानांसाठी विविधभारती या आकाशवाणीच्या वाहिनीवर जयमाला नामक कार्यक्रम लागत असे, देशभरातील सैनिक हा कार्यक्रम आवडीने ऐकायचे, या कार्यक्रमात लता मंगेशकरांचीच गाणी जास्त लागायची आणि ती गाणी सैनिकांचा उत्साह वाढवणारी असायची, असे नुकतेच एका कार्यक्रमात एका निवृत्त मेजर जनरलने सांगितले होते.
आयुष्यभर संगीतसेवा करणाऱ्या लता मंगेशकरांनी समाजसेवाही त्याच निष्ठेने केली. आपल्या संगीताच्या जोरावर त्यांनी अनेक सामाजिक कामांना पैसा उभा करून दिला. स्व. बाबा आमटेंच्या आनंदवन उपक्रमासाठी त्यांनी मुंबईत कार्यक्रम घेऊन काही करोड रुपये उभे करून दिले होते. असेच ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन उभारलेल्या निधीतून पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्यांनीच उभारले. आज हजारो रुग्णांचे ते आशास्थान बनले आहे.
अशी ईश्वरी देणगी लाभलेली गायिका आणि समाजभान जपणारी व्यक्ती आज ९ दशकांचा प्रवास आटोपून आपल्यातून निघून गेली आहे, लता मंगेशकर जरी आपल्यातून गेल्या तरी आपल्या सुरांनी त्या अजरामर राहणार आहेत. जोवर ही पृथ्वी आहे आणि सूर्य चंद्र आहेत, तोवर त्यांचे नाव कायम राहणार आहे. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते रे असे त्यांनीच गायलेले एक अजरामर गीत आहे, आज या गानसरस्वतीला अखेरचा दंडवत घालून तिला निरोप देऊया.

लता मंगेशकर यांना पंचनामा परिवाराची विनम्र आदरांजली.

अविनाश पाठक

Leave a Reply