शिवाजी पार्क येथे होणार लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पंतप्रधान मुंबईत येणार

नवी दिल्ली : ६ फेब्रुवारी – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधनझाले. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यानुसार दोन दिवस राष्ट्रध्वज आर्ध्यावर खाली घेतला जाईल. लतादीदींच्या पार्थिवावर मुंबईत शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
लतादीदींचे पार्थिव दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी आणले जाईल. तिथे ३ ते ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी लतादीदींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. तसंच भारतीय लष्कराच्या वाहनातून त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे आणले जाईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आलीय.
पंतप्रधान मोदी हे साधारण दुपारी ४.३० वाजता मुंबई विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते ५ वाजेपर्यंत शिवाजी पार्क येथे पोहोचतील. शिवाजी पार्कवर अंत्यदर्शन घेऊन ते लतादीदींना श्रद्धांजली वाहतील, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशातील सर्व प्रमुख मान्यवरांनी लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शोक व्यक्त केला आहे. ‘स्वरकोकीळा’ भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने आपल्याला दुःख झाले आहे. त्यांनी आपल्या गाण्यातून आणि आवाजातून संगीत प्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले. भाषेची बंधनंही त्यांनी तोडली. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले असून ते न भरून निघणारे आहे, अशी भावना लोकसभा अध्यक्ष ओमि बिर्ला यांनी व्यक्त केली.

Leave a Reply