केंद्र सरकारतर्फे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, पंतप्रधान राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली : ६ फेब्रुवारी – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. ऐ मेरे वतन के लोगों…, मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे… अशी अनेक अजरामर गाणी गाणाऱ्या लतादीदींच्या निधनावर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.
केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. लतादीदींच्या स्मृतीत आणि सन्मानार्थ दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.
लतादीदींचा २००१ मध्ये देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी भारतरत्न पुरस्काराने प्रदान करून लतादीदींचा सन्मान केला होता.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर या कायम स्मरणात राहतील. लता दीदींचे कर्तृत्व अतुलनीय आहे, अशा भावना राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘लतादीदींच्या निधनाने मोठे दुःख झाले आहे. लतादीदींच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे’, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत. भारतीय संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ही महान व्यक्ती कित्येक पिढ्या स्मरणात राहील. लतादीदींचा आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. फक्त संगीत क्षेत्रच नाही, तर त्याच्याही पलिकडे लतादीदींचे योगदान आहे. देशाच्या विकासासाठी त्या कायमच पुढाकार घ्यायच्या. लतादीदींना विकसित भारत आणि शक्तिशाली भारतासाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Leave a Reply