काँग्रेसला टाळून विरोधकांचे ऐक्य अशक्य – अविनाश पांडे

नागपूर : ४ फेब्रुवारी – देशात भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायचा असेल, तर काँग्रेसला टाळून विरोधकांचे ऐक्य करून चालणार नाही, काँग्रेसला सोबत घेऊनच आणि तेही राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधक एकत्र आले तरच भाजपला सक्षम पर्याय देता येईल, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे यांनी आज नागपुरात बोलतांना केला.
नागपुरात प्रेस क्लब मध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना अविनाश पांडे म्हणले की काँग्रेसला १३५ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. काँग्रेसची पाळेमुळे देशात सर्वत्र रुजलेली आहेत. देशात अनेक वर्ष काँग्रेसने सत्तेत राहून विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे काँग्रेसला टाळून चालणार नाही, काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधक एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेस काही करते आहे काय? असे विचारले असता ही प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे, असे सांगत लवकरच आम्ही त्यात यशस्वी होऊ असेही ते म्हणाले.
देशात सध्या परिवर्तनाची लाट आली आहे, त्याचे प्रत्यंतर येत्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये दिसून येईल, असा दावा अविनाश पांडे यांनी केला. गत ७ वर्षात भाजपने सत्ता मिळवण्यासाठी आणि राबवण्यासाठी अत्यंत चुकीचे मार्ग वापरले, धनशक्ती आणि राजकीय बळाचा गैरवापर केला, असेच चालू राहिले तर भविष्यात निवडणूक प्रक्रिया आणि संविधानावरचा जनसामान्यांचा विश्वास उडू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर तसेच पंजाब येथे काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले. उत्तरप्रदेशातही आमची लक्षणीय कामगिरी असेल असे त्यांनी सांगितले. उत्तराखंडात २०१७ मध्ये भाजपला बहुमत होते, त्यावेळी उत्तराखंड बदलून टाकण्याचा दावा त्यांनी केला होता, मात्र ५ वर्षात तीन मुख्यमंत्री बदलण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही, परिणामी जनतेने नुकसान झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply