गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी लंपास केली १९ लाखांची रोकड

अहमदनगर : ४ फेब्रुवारी – नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव गावच्या शिवारात गुरुवारी रात्री चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या एटीएम मधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.
नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत डीव्हीआर लंपास केला. एटीएममधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली असल्याचे बँकेच्या शाखेचे शाखाधिकारी कांचन दाभाने यांनी सांगितले.
घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष फड आदींनी धाव घेतली. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Leave a Reply