हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेत वाढ, मिळणार सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली : ४ फेब्रुवारी – ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.
तसेच, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओवेसी यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा देखील तत्काळ प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर, हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. “१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”. असं ओवेसी म्हणाले होते.
ओवेसी यांनी यावेळी हल्ल्यामागे कोणीतरी मास्टरमाइंड असून निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमधील धर्मसंसदेत माझा जीव घेण्यासंबंधी वक्तव्य करण्यात आलं होतं, ते देखील ऑन रेकॉर्ड असून त्याचीही दखल घ्यावी असं ते म्हणाले होते.

Leave a Reply