संघ मुख्यालयातील रेकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे

नागपूर : ३ फेब्रुवारी – नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील रेकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला असल्याची तोंडी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय रेकी प्रकरणी जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्या संशयीत तरुणावर नागपूर पोलिसांनी यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच तपासात नागपूर पोलीस संशयीत 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेणार होते. मात्र, आता या प्रकरणाचा तपास एटीएसकडे गेल्याने पुढील कारवाई पोलिसांच्या मदतीने होणार एटीएस करणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या संशयीत दहशतवाद्याने रेकी केल्याची माहिती तपास यंत्रणेकडून नागपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक श्रीनगर येथे जाऊन चौकशी करून परत आले होते. त्यानंतर नागपुरात रेकी केल्या प्रकरणी यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात पुढील तपासासाठी नागपूर पोलीस संशयीत तरूणाला तपासासाठी नागपूरात आणणार होते. परंतु, तपासाची पुढील जवाबदारी सरकारकडून एटीएसला सोपवण्यात आली. तपास एटीएसकडे गेल्याच्या माहितीला नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दुजोरा दिला आहे.
डिसेंबर महिन्यात सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्या तरुणाने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची रेकी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल परिसरातील मुख्यालयासह रेशीमबाग मधील संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तेथील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. तसेच या ठिकाणी फोटो काढणे आणि परिसराजवळ ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्या अनुषंगाने गरज पडल्यास सुरक्षा आणखी वाढवू असेही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

Leave a Reply