कौटुंबिक वादातून पोलीस शिपाई महिलेने केली आत्महत्या

गडचिरोली : ३१ जानेवरी – कौटुंबिक वादातून जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. प्रणाली काटकर (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत प्रणाली काटकर ही सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील मूळ रहिवासी असून, मागील सात-आठ वर्षांपासून ती गडचिरोली पोलिस दलात कार्यरत होती. दोन वर्षापूर्वी संदीप पराते या पोलिस शिपायाशी तिचा विवाह झाला. संदीपचा हा दुसरा विवाह होता. दोघेही पोलिस मुख्यालयानजीकच्या पोलिस कर्मचारी वसाहतीत एका इमारतीत वास्तव्य करीत होते. परंतु, दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. काल रात्री दोघांमध्ये झालेला भांडण विकोपाला गेल्याने प्रणालीने विष प्राशन केले.
तत्काल पती संदीप पराते याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. परंतु, रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक कतलाम यांनी सांगितले.

Leave a Reply