पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघिणीच्या गळय़ात शिकारीचा सापळा आढळल्याने प्रशासनात खळबळ

नागपूर : २८ जानेवारी – पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघिणीच्या गळय़ात शिकारीचा सापळा आढळल्याने व्याघ्रप्रकल्प प्रशासनात खळबळ उडाली आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये ही वाघीण आढळली असून तिचा मृत्यू तर झालेला नाही, याचा शोध व्याघ्रप्रकल्पाची चमू घेत आहे.
पेंच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी वनक्षेत्रातील मायकेपार कक्षात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून २६ जानेवारीला छायाचित्रांची तपासणी करताना ‘टी-४१’ या वाघिणीचे गळय़ात शिकारीचा सापळा अडकला असल्याचे छायाचित्र सापडले. या ठिकाणापासून शेतजमीन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. मागील कॅमेरा ट्रॅपचा अहवाल तपासला असता ती वाघीण पश्चिम पेंच, सालेघाट, नागलवाडी पर्वतरांगातून जात असल्याचे आढळले. तिचा शोध घेण्यासाठी पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने अधिक कॅमेरा ट्रॅप तैनात केले आहेत. तिचा माग घेण्यासाठी एकूण नऊ गस्तीपथके तयार करण्यात आली आहेत. गावकऱ्यांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली असून सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
गावातील सरपंच, पोलीस पाटील, पर्यावरण विकास समिती अध्यक्ष यांचा एक व्हॉट्सअप समूह तयार करण्यात आला आहे. गाव परिसरात वाघीण आढळल्यास गावकऱ्यांना सावध करुन अफवा रोखण्यासाठी तसेच वाघिणीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे.
शेत शिवार तसेच जंगलक्षेत्रात गस्तीपथके वाघिणीचा शोध घेत आहेत. नागपूर प्रादेशिक विभागालाही सतर्क करण्यात आले आहे.

Leave a Reply