नितीन गडकरींनी आपल्या आजोळच्या जिल्ह्याला केली घसघशीत मदत

अमरावती : २ मे – कोरोनाची भयावह लाट थोपवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती जिल्ह्यासाठी भरघोस मदत केली आहे. एकूण 30 व्हेंटिलेटर्स आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात पाच कोटी रुपये खर्चून 200 क्युबिकचा ऑक्सिजन प्लांट दिला आहे.
अमरावती जिल्हा हा नितीन गडकरींचा आजोळचा जिल्हा आहे. अमरावतीतील राहाटगावकर परिवार हे नितीन गडकरींचे आजोळ आहे. त्यांच्या मातोश्री स्वर्गीय भानुताई गडकरी या राहाटगावकर परिवाराच्याच कन्या होत्या. गडकरी ज्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळी नव्वदी गाठलेले गडकरींचे मामा गजाननराव राहाटगावकर आवर्जून नागपुरात भाच्याचे कौतुक बघायला आले होते. आजही राहाटगावकर परिवारातील गडकरींचे मामेभाऊ महेंद्र आणि मुकुंद अमरावतीत सपरिवार वास्तव्याला आहेत.
स्वर्गीय गजाननराव राहाटगावकर हे निष्ठावंत संघ स्वयंसेवक होते. आपले आयुष्य त्यांनी संघकार्यासाठी वाहून दिले होते विशेष म्हणजे त्यांचा भाचा राष्ट्रीय स्तरावर गाजत असताना भाच्याच्या प्रतिष्ठेचा स्वतःसाठी आणि परिवारासाठी त्यांनी कधीही लाभ घेण्याचा प्रयत्न केला नव्हता आजही रहाटगावकर परिवाराने ही परंपरा जपलेली आहे.
कोविडची लाट थोपवण्यासाठी नितीन गडकरी यांनी ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीवीर, व्हेंटिलेर्टर्स, रुग्णवाहिका आणि आवश्यक त्या सामग्रीचा पुरवठा करण्याचा सपाटा लावला आहे. अमरावतीला देखील ठोस मदत द्यावी, अशी विनंती डॉ. सुनील देशमुख यांनी नितीन गडकरी यांना केली होती. त्यानुसार नितीन गडकरी यांनी मदतीच्या पहिल्या टप्प्यात अमरावतीला भरीव मदतीचा हात दिला. नागपूर येथे डॉ. सुनील देशमुख यांच्यासह श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, पीडिएमसीचे डीन डॉ. अनिल देशमुख, महापौर चेतन गावंडे, मनपा सभागृह नेता तुषार भारतीय, सरचिटणीस प्रशांत शेगोकार यांच्याकडे अमरावती शहरासाठी 30 व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले.
यातील दहा व्हेंटिलेटर्स डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाल, दहा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व दहा अमरावती महानगर पालिकेला देण्यात आले. आगामी काळात ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला 200 क्युबिकचा ऑक्सिजन प्लांट सीएसआर फंडातून उभारण्याचे नितीनजींनी कबूल केले आहे. आगामी आठवड्यात हा प्लांट उभारणीला प्रारंभ होणार आहे. या प्लांटमुळे अमरावती शहराला व जिल्ह्याला देखील ऑक्सिजन पुरवता येणार आहे. या शिवाय अमरावती शहराला आणखी मदत करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. भरघोस मदत केल्याबद्दल सर्वांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply