मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनाची शक्ती

अस म्हणतात, माणसाच्या मनात एका मिनटात २५ ते ३० विचार एकाचवेळी येतात. संपूर्ण दिवसात साधारणपणे मोजायचे झाले तर ४०,००० ते ६०,००० विचार येतात. समजा ह्याच स्पीडने विचार केला तर मला सांगा माणसाचे मन कमजोर होईल की नाही? हा शोध विज्ञानाने लावला. ह्या मनाची गती खूप तीव्र झाली आहे. जर मनाची शक्ती वाढवायची असेल तर मनन शक्तीचा उपयोग करणे गरजेचे आहे.
लहानपणी शाळेत, अभ्यास लक्षात राहण्यासाठी आपण पाठांतर करायचो, वारंवार एकच वाक्य मनामध्ये बोलण्याने तोंडपाठ व्हायचे. परंतु आयुष्याचे गणित वेगळे आहे. आपल्याला आपले आयुष्य सफल करायचे असेल तर आपल्या मनातल्या शक्तीला वाढवणे गरजेचे आहे.
आता मनन म्हणजे काय? तर, मनन म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करणे, ज्याला आपण ‘ चिंतन ‘ म्हणू. आता हे चिंतन दोन प्रकारचे. एक म्हणजे सकारात्मक व दुसरे म्हणजे नकारात्मक.
१. आपल्या विचारांच्या चिंतनाची दिशा जर सकारात्मक असेल तर आपलं मन हे सबल बनेल.
२. जर आपल्या विचाराची दिशा जर नकारात्मक असेल तर आपलं मन हे कमजोर, कमकुवत बनेल.
आपल्या स्वभावात योग्य विचार आणण्याची क्षमता ही
प्रत्येकात नसते. काही काही विचाराची क्षमता ही मनामध्येच समाप्त होते. एखादा विचार पक्का करून ती गोष्ट करून दाखवणे हे एखाद्याला जमते. उदा. एखादी व्यक्ती आर्थिक बाबतीत सबल नसेल पण जर त्यानी प्रयत्न केला की, मी ही गोष्ट मिळवून दाखवील आणि त्या दिशेने त्याने वाटचाल केली तर ती व्यक्ती सफल झाल्याशिवाय राहणार नाही.
समुद्रातल्या लाटा जशा सागरात विलिन होतात तसेच काही काही विचार हे मनातल्या मनात समाप्त होतात.एखाद्या महत्त्वाच्या शिखरापर्यंत पोचायचे असेल तर त्या गोष्टीचे चिंतन करून त्यावर विचार करून ते शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शरीराला जशी अन्नाची गरज असते तशीच मनाला मनन शक्तीची गरज असते. आपल्या शरीराला आपण रोज खावू घालतो. ते अन्न पचावे म्हणून त्याकरता खाल्लेले अन्न आपण चावून चावून खातो त्याने आपली पचन शक्ती वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन शक्ती चांगली असावी लागते. त्याचप्रमाणे मनन केल्याने मनाची शक्ती वाढते व विचारांना ऊर्जा मिळून आपल्या कार्याची क्षमता वाढण्यास मदत होते. एखादे कार्य आपल्या विचारावर मनन करून ते विचार बळकट करावे लागतात. थोड कठीण आहे पण अशक्य नाही.
चांगल्या विचारांवर केले चिंतन करण्यासाठी स्वतःला नको असलेल्या नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. असा विचार करा की, नको असलेल्या गोष्टीपासून दूर राहून चांगले मनन करण्यासाठी वेळ हा काढायला हवा
आपल्या आयुष्याचा मार्ग हा सहज, सरळ व सफल करायचं असेल तर सकारात्मक चिंतन करून आपल्या मनाला शक्तिशाली बनवा. मनन करून आयुष्याचे रहस्य आत्मसात करा. स्वतःचे गुरू बनून स्वतःला आयुष्यात येणाऱ्या अनुभवाचे स्वतःला धडे द्या. ह्या चंचल विचारात, मनात किती शक्ती आहे ह्याचा अभ्यास करा.

पल्लवी उधोजी

Leave a Reply