पश्चिम बंगालमध्ये नेताजींना आदरांजली वाहतांना भाजप व तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, सुरक्षारक्षकाने केला हवेत गोळीबार

कोलकाता : २३ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे निमित्त साधून पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने राजकारण करायची संधी सोडली नाही. त्यामुळे पश्चिम बंगाल येथील भाटपाडा येथे नेताजींना आदरांजली वाहतना परिस्थिती इतकी चिघळली की, भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षारक्षकाला चक्क हवेमध्ये गोळीबार करावा लागला. नेमके घडले काय, जाणून घेऊयात.
पश्चिम बंगालमधील भाटपाडा बैरकपूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, त्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या उतावीळपणामुळे परिस्थिती चिघळली. नेताजींच्या पुतळ्याला माळ कोणी घालायची यावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. खासदार अर्जुन सिंह यांनी याठिकाणी धडक मारली. त्यामुळे अगोदर बाचाबाची झाली. त्यानंतर तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते थेट गुद्दागुद्दीवर आले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अर्जुन सिंह यांना निशाणा करून दगडफेक केली, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. त्यानंतर अर्जुन सिंह यांच्या सुरक्षारक्षकाने हवेमध्ये अनेक राऊंड फायरिंग केली. त्यानंतर अर्जुन सिंह यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यावेळी पोलिसही उपस्थित होते.
तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वादविवादामुळे परिस्थिती चिघळली. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अर्जुन सिंह यांनी गाडीची तोडफोड केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अर्जुन सिंह यांच्या सुरक्षारक्षकाने सात राऊंड हवेत फायरिंग केले. हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, परिसरातील तणाव पाहता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आज रविवारी सकाळी साडेदहा वाजता आमचे आमदार पवन सिंह हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांनी देण्यासाठी पोहचले. तेव्हा तृणमूलच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळीबार केला. विटा फेकल्या. मी पोहचल्यानंतर त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. हे सारे पोलिसांसमोर सुरू होते. त्यांच्यासमोरच माझी गाडी तोडली, असा आरोप त्यांनी केला आहे.

Leave a Reply