राज्यात लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करून लस घेण्यास भाग पाडू – राजेश टोपे

जालना : २३ जानेवारी – राज्यात कोरोना लसीचे दोनही डोस घेणे आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमने-सामने आलं आहे. कोरोना लस सक्तीची नसल्याचं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारची याबद्दलची सक्तीची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याच प्रश्नावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की, राज्यात लसीकरण समाधानकारक असून, लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू. तसेच, त्यांना लस घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
उद्यापासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यात लस घेणं बंधनकारक नाही मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडू असेही टोपे म्हणाले.
उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते. लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात 62 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचे समोर आलंय. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.

Leave a Reply