उद्धव ठाकरे यांचा देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश

नवी दिल्ली : २१ जानेवारी – देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंसाठी चांगली बातमी आहे. देशात टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश आहे. एका सर्वेतून ही मोठी माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी व्होटरने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर सर्वे केला. २०२२ हा अतिशय ताजा सर्वे आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? यातून समोर आले आहे. यात पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकावर आहेत. तर ५ व्या क्रमांकावर आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ६ व्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ७ व्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, ८ व्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ९ व्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत.
सर्वेत कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती रेटिंग मिळाले यावर मुख्यमंत्र्यांची क्रमवारी ठरली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना सर्वेत सर्वाधिक ७१.१ टक्के रिटिंग मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ममता बॅनर्जींना ६९.९ टक्के, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एम. के. स्टॅलिन यांना ६७.५ टक्के, तर ६१.८ टक्के रिटिंग मिळवत महाराष्ट्राते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांवर आहेत. त्यानंतर ५ व्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना ६१.१ टक्के रिटिंग मिळाले आहे.
सर्वेत टॉप ९ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकच मुख्यमंत्री आहे. तेही आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा आहेत. त्यांना ५६.६ टक्केच रेटिंग मिळाले आहे. आसामसह गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सर्वेत ४० टक्क्यांहून अधिक समाधानकारक रेटिंग मिळाल्याचे सर्वोतून समोर आले आहे.

Leave a Reply