अमोल कोल्हेंच्या चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही विरोध

मुंबई : २१ जानेवारी – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान भाजपाकडूनही यावर प्रतिक्रिया आली असून यामध्ये काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं की, “एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का हे त्यांनी एकदा जाहीर करावी. ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे”.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही. सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो”.

Leave a Reply