अमोल कोल्हे यांचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही – नाना पटोले

मुंबई : २१ जानेवारी – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारलेला ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. कोल्हे हे लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेंना हिरो बनवण्याचं काम करु नये, असंही पटोले म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
“अमोल कोह्ले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते फक्त कलाकार नाहीत. विशेष करुन गोडसेच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघात व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखं आहे. अशा प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचं आहे. या देशाला फक्त महत्वा गांधींचाचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेलं आहे,” असं नाना पटोलेंनी या चित्रपटाला विरोध करताना म्हटलं आहे.
गोडसे प्रवृत्तीने देश तुटेल. म्हणूनच अशा विघातक विचाराला हिरो बनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो,” असंही नाना पटोले म्हणाले. त्याच प्रमाणे हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असंही नाना पोटेलेंनी म्हटल्याचं वृत्त झी २४ तासने दिलं आहे. शरद पवारांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी मागणीही नाना पटोलेंनी केलीय.
अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यासंदर्भात विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतलाय. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, अमोल कोल्हेंनी ती भूमिका पक्षामध्ये प्रवेश करण्याआधी साकारली असून एक कलाकार म्हणून माझा अमोल कोल्हेंना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय.
अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply