संपादकीय संवाद – शिवसेनेने केंद्र सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणे थांबवावे

आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने आपल्या संपादकीयातून केंद्र सरकारवर जोरदार दुगाण्या झाडल्या आहेत. याला निमित्त झाले आहे, ते पश्चिम बंगाल सरकारने गणतंत्र दिनासाठी पाठवलेला चित्ररथ नाकारला जाण्याचे. या निमित्ताने शिवसेनेने केंद्र सरकारवर इतिहास बदलण्याचा आरोप केला आहे.
सध्या केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. संघावर कायम देशाचा इतिहास बदलत असल्याचा आरोप केला जातो, त्यामुळे आज सामनाने केलेल्या आरोपात तसे नवे काहीही नाही.
या देशाचा खरा इतिहास गेल्या दीड शतकात कधीच लोकांसमोर आला नाही. आपल्या देशाचा इतिहास लिहिण्याचे काम इंग्रजांनी केले, त्याआधी मोगल काळापर्यंत इतिहासाच्या बखरी लिहिल्या जात असत. या बखरीतील नोंदी जश्याच्या तश्या लोकांसमोर आणल्याचं गेल्या नाहीत, इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार त्यात फेरफार केले, आणि असा फेरफार केलेला थोडक्यात म्हणजे तोडमरोड केलेला इतिहास आपल्यासमोर आणला गेला. आजही बाबासाहेब पुरंदरे, ना. स. इनामदार, विश्वास पाटील शिवाजी सावंत अश्या अनेक अभ्यासकांनी अभ्यास करून लिहिलेल्या ग्रंथांमधले वास्तव वाचले कीं या गोष्टीची कल्पना येते. इतिहास हा इंग्रजांनी आपल्या सोयीने लिहिला आणि तो तोडमोड केलेला इतिहास आमच्या माथी मारला गेला. इंग्रजानानंतर आलेल्या नेहरू सरकारनेही हाच इतिहास पुढे चालवला, त्यांनी तर गांधी आणि नेहरू या दोन पुण्यात्म्यांशीवाय इतर कुणी देशासाठी काही केले हे कधी मान्यच केले नाही. आपल्या देशावर मुस्लिमांनी आक्रमण करून आपला देश गुलाम बनवला,या देशात सक्तीने हिंदूंचे धर्मांतरं घडववले त्यांच्यावर अत्याचार केले, तरीही या सर्व अत्याचारी मंडळींना आपल्या इतिहासात मानाचे स्थान आहे. आजही दिल्लीत औरंगजेब, अकबर , शहाजहान या मुस्लिम शासकांच्या नावे रस्ते आणि चौक आहेत. अश्या भारतद्रोही मंडळींचा इतिहास आजही बळजबरीने आमच्यावर लादला जातो आहे.
मग असा इतिहास बदलला आणि वास्तव इतिहास लोकांसमोर आणला तर त्यात वावगे काय? एका काळात औरंगजेबाच्या क्रूर कृत्यांची आठवण देणारे औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे मुस्लिम साम्राज्याची आठवण देणारे उस्मानाबाद हे नाव बदलून त्याला धाराशिव हे मूळ नाव दिले जावे, हा शिवसेनेचाच आग्रह होता ना? मुंबईतील काही रेल्वे स्थानकांना इंग्रजांच्या जुलमी राजवटीची आठवण देणारी नावे होती, ती बदलण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला होता ना? मग मोदी सरकार अभ्यासकांशी चर्चा करून खरा इतिहास जनसामान्यांना उपलब्ध करून देणार असेल, तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण काय?
हा आक्षेप फक्त राजकारणासाठी घेतला जातो आहे, हे शेम्बडे पोरही सांगेल, मात्र त्यातून खरा इतिहास जनसामान्यांच्या समोर आणण्याच्या मूळ हेतूला धक्का पोहोचणार आहे. ही बाब लक्षात घेत शिवसेनेनेकेवळ विरोधासाठी आणि निव्वळ राजकारणासाठी केंद्र सरकारला, विरोध करणे थांबवावे, इतकेच पंचनामाला सुचवायचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply