चंद्रपूर : १९ जानेवारी – चंद्रपुर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींचा निकाल हाती आला आहे. या निकालाने काँग्रेसचा गोटात आनंद पसरला आहे. तर जिल्ह्यात काँग्रेसने तीन नगर पंचायतींवर बहूमत मिळविले तर दोन नगर पंचायतींमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपाला केवळ पोंभुर्णा नगर पंचायतीवर बहुमत मिळविता आले. पाच नगर पंचायतीमध्ये भाजपा पिछाडीवर गेला आहे.
जिल्ह्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेस-भाजपात काट्याची लढत होणार, अशी शक्यता वर्तविली गेली. नगरपंचायतीच्या निवडणूकांसाठी काँग्रेसचे दिग्गज नेते मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार सूभाष धोटे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभा अनेक मतदारसंघात सभा गाजवल्या होत्या. त्यामुळं काँग्रेस -भाजप यांच्यात अटी-तटीची लढत होती.
सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पोंभुर्णाचा निकालाकडे जिल्हाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणेच येथे भाजपाने बहूमत मिळविले आहे.१७ पैकी भाजपाचे १० उमेदवार विजयी झालेत. तर, शिवसेनेने ४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर वडेट्टीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सावली येथे काँग्रेसने १४ जागा जिंकल्या आहेत. भाजपाला येथे तीन जागा जिंकता आल्या आहेत.
सिंदेवाही-लोनवाही नगर पंचायतमध्ये काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपणा, जिवती आणि गोंडपिपरी या तीन नगर पंचायतीत काँग्रेसने सरशी घेतली. कोरपणा नगर पंचायतीवर काँग्रेसला बहूमत मिळाले आहे. काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळविला आहे. तर, भाजपला ४ जागा जिंकता आल्या आहेत.