जुन्या वैमनस्यातून नागपुरातील वाठोड्यात एकाचा खून

नागपूर : १८ जानेवारी – शहरातील वाठोडा पोलिस ठाणे हद्दीत एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन आरोपींनी मिळून त्याची हत्या केली. चाकूने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. यात युवकाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. रोशन पुरी (वय २0) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान, याप्रकरणी मिळालेल्या माहितीवरून सदर घटना ही जुन्या वैमनस्यातून घडल्याचे सांगण्यात येत आहे. जुना वाद असल्यामुळे मृतक रोशनचा काटा काढण्याची योजना तयार करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी असलेले अनमोल मेश्राम आणि कालू यांनी रोशनला जुन्या वादातून गाठल्याचा निर्धार केला होता. दरम्यान, रोशन पुरी हा सोमवारी रात्री साडेआठ वाजता दिघोरी घाटामागे असलेल्या मेर्शामवाडीतील एका मित्राला भेटायला गेला होता. योगेश्वरनगरात तो उभा असताना त्याला अनमोल मेर्शाम आणि त्याचा साथीदार बंटी भेटला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वादाचे कारण कळले नाही. वाद वाढला आणि त्यानंतर अनमोल आणि कालूने रोशनवर चाकूने सपासप वार केले. यात रोशनचा मृत्यू झाला. आरोपींनी रोशनची हत्या केल्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. हत्या झाल्यानंतर ही बातमी वार्यासारखी पसरली. माहिती मिळताच वाठोडा पोलिस घटनास्थळी पोहचते झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर रोशनचा मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. आरोपींनी रोशनची हत्या नेमक्या कोणत्या कारणावरून केली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply