आंतरराष्ट्रीय मंचावर भाषण देत असताना पंतप्रधानांच्या टेलिप्रॉम्टरमध्ये आलेल्या बिघाडामुळे उडाला गोंधळ

नवी दिल्ली : १८ जानेवारी – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे, असं मोदींनी यावेळीस जगभरातील देशांना सांगितलं. आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. मात्र त्यांचा भाषणापेक्षा सध्या अधिक चर्चा होताना दिसतेय या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाबद्दल.
झालं असं की, भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले.
पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.
या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन होऊ लागलीय.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे.
सोशल मीडियावर या प्रकरणानंतर मिम्सची लाट आल्याचं पहायला मिळत आहे.

Leave a Reply