अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक पुतळा हटवल्याने पुन्हा नवा वाद

अमरावती : १७ जानेवारी – अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक पुतळा हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. दर्यापूर येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने हटवत कारवाई केली आहे. शिवसेनेकडून हा पुतळा बसवण्यात आला होता. याआधी शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये परवानगी नसतानाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं पुतळा हटवण्याची कारवाई केली.
आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवाना बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवल्यानंतर प्रशासनाने दर्यापूरमधील पुतळा हटवण्याची तयारी सुरु झाली होती. हा पुतळा काढू नये यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं. तसंच अनेक शेकडो कार्यकर्ते या मागणीसाठी चढले पाण्याच्या टाकीवर चढले होते. मात्र मध्यरात्री नगरपालिका आणि पोलिसांनी हा पुतळा हटवला. यामुळे दर्यापूरमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply