पतंगबाजांच्या भीतीने नागपुरातील सर्व उड्डाणपूल आज बंद

नागपूर : १४ जानेवारी – एकीकडे मकर संक्रांतीच्या दिवशी पंतगबाजीचा आनंद लुटला जात आहे. दुसरीकडे चीनी मांज्यामुळे जीवितास धोका उत्पन्न होत असल्याने काळजी घेतली जात आहे. पतंगबाजी करताना वाहतुकदारांच्या जीवितास धोका होऊ नये, या उद्देशाने आज नागपूर शहरातील सर्व प्रकारचे लहान-मोठे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांतील घटना लक्षात घेता दरवर्षी शहरातील उड्डाणपूल बंद ठेवले जातात. यावर्षी या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना पोलीस दिसून येत आहेत. प्रत्येक पुलाच्या दोन्ही टोकाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
उपराजधानी नागपुरात अनेक मोठे उड्डाणपुल आहेत. यामध्ये चार किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचा समावेश आहे. यावरून दरदिवशी हजारो वाहन ये-जा करतात. आज मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी असते. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांच्या गळयात मांजा अडकून एकाद्याचा जीवदेखील जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागातील उड्डाणपूल आज संपूर्ण दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत.
पतंग कापली गेल्यानंतर नायलॉन मांजा रस्त्यांवर पडल्यामुळे उपराजधानी नागपुरात अनेकांचा जीव गेलेला आहे. यावर्षीही काही घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर गेल्या काही वर्षात अनेकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे मकरसंक्रातीच्या दिवशी शहरातील पुलांवरील वाहतूक बंद ठेवली जाते.

Leave a Reply