चारचाकीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

नागपूर : ११ जानेवारी –रामटेक रोडवर कांद्री माईनजवळ रोड अपघातामध्ये बिबट्या पिल्ल्याचा(मादी) मृत्यू झाला आहे. १० जानेवारी रोजी सायंकाळी घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक निरीक्षण व शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याचे पिल्लू ५-६ महिने वयाची असून, मृत्यू हा चारचाकी वाहन बिबटच्या डोक्यावरून गेल्याने झाला असल्याचे निदर्शनास आले. शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या पिल्ल्यावर अत्यंविधी पूर्ण करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून बिबट व वाघाच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. गेल्या ८ जानेवारीला कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट शावकाचा अकस्मात मृत्यू झाला होता.
त्याचे शवविच्छेदन होऊन काही तास होत नाही तोच रोड अपघातामध्ये बिबट्याचे पिल्लू मृत्युमुखी पडले आहे. याप्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक (जंकास १, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), रामटेक उपविभाग, संदीप गिरी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा नोंदविला. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकारणाच्या आधारभूत मानक प्रणालीनुसार कार्यवाही रात्री ७.४५ पयर्ंत करण्यात आली. रात्री उशीर झाल्याने शवविच्छेदन दुसर्या दिवशी करण्याच्या निर्णय घेण्यात आला व मृत बिबट्यास नागपूर येथील ट्राझिट ट्रिमेंट सेंटर येथे आणण्यात आले.
दि. १0 जानेवारी रोजी सकाळी १0.४५ वाजता वनविभागाचे अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे प्रतिनिधी अविनाश लोंढे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), म.रा. नागपूर यांचे प्रतिनिधी उधमसिंह यादव, सदस्य, वन्यजीव सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अधिकारी, रेस्क्यु सेंटर, नागपूर विजयकुमार गंगावने, पशुवैद्यकीय अधिकारी, श्रेणी -१, डॉ. विद्या पानसरे, ट्राझिट ट्रिमेंट सेंटर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयुर काटे यांचे उपस्थितीत मृत बिबट पिल्ल्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ट्राझिट ट्रिमेंट सेंटर परिसरामध्ये मृत बिबट पिल्ल्यावर अत्यंविधी पूर्ण करण्यात आला. उपरोक्त संपूर्ण कार्यवाही ही उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग डॉ. भारत सिंह हाडा यांचे मार्गदर्शनाखाली संदीप गिरी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास १, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), रामटेक उपविभाग, रितेश भोंगाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, रामटेक व रामटेक वनपरिक्षेत्रातील वनपाल गजानन शेटे, वनरक्षक राठोड, सोडगीर, शिंदे, विभुते यांनी पार पाडली. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकारणाच्या आधारभूत मानक प्रणालीनुसार पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी हे करीत आहेत.

Leave a Reply