पतंग पकडण्याचा मोह जीवावर बेतला, २ दिवसांपासून बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळला,

नागपूर : ९ जानेवारी – मकरसंक्रात सण काहीच दिवसांवर आहे. परिणामी, शहरात आकाशात पतंग आणि मांजाची लुटालुट होतानाचे चित्र दिसून येत आहे. अशातच या पतंग आणि मांजा पकडण्याचा मोह एका ९ वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतला. मुलगा आढळून आला नाही म्हणून वडिलांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु, हा चिमुकला एका विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. आकाश उर्फ अंश संजय बोरकर (वय ९, रा. डवल्याची वाडी, पारडी) असे या चिमुकल्याचे नाव आहे.
आकाशला पतंग उडविण्याची खूप आवड होती. पतंग आणि मांजा मिळविण्याच्या नादात तो कटलेल्या पतंगीच्या मागे धावायचा. पतंगीच्या या खेळात तो अधिक वेळ घराबाहेरच घालवायचा. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी बाहेर पडलेला आकाश घरीच आला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. काही केल्या आकाश सापडत नसल्यामुळे अखेर घरच्यांनी पोलिसात त्याच्या हरविल्याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आकाशची शोधमोहीम राबविली. पोलिसांनी बोरकर यांच्या घराजवळील एका विहिर व नाल्याचीही तपासणी केली. परंतु, आकाश कुठेही दिसून आला नाही. दरम्यान, शुक्रवारी, सकाळच्या सुमारास आकाशच्या वडीलांनी त्यांच्या घरामागे असलेल्या बारदान्याचा गोदामातील विहिरीत डोकावले असता त्यांना जो नजारा दिसला तो त्यांना धक्का देणारा होता. त्यांचा आकाश विहिरीत पडला असून, त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. घटना पसरली आणि कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला. दरम्यान, पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्याच्या हातात मांजा असल्याचे दिसून आले. त्यामुळे, पतंग व मांजामुळे या ठिकाणी आल्यावर विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply