विदर्भासह, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

नागपूर : ६ जानेवारी – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
मागील महिन्यात मराठवाडा, विदर्भात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जानेवारीतही महराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळं राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात ६ ते ९ जानेवारीदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मध्य भारतात पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या उत्तरेकडील भागात पाश्चात्य विक्षोभामुळे ६ जानेवारी ते १० जानेवारीला काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, ९ जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, या भागांसाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तर, ८ जानेवारीला बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply