पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीची चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने स्थापली उच्चस्तरीय चौकशी समिती

चंदिगड : ६ जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीप्रकरणी पंजाब सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. न्यायमूर्ती (निवृत्त) मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव, गृह आणि न्याय व्यवहार अनुराग वर्मा यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती ३ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत, असे पंजाब सरकारने म्हटले आहे. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात या प्रकरणी याचिका करण्यात आली असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
त्याचवेळी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या निष्काळजीपणाशी संबंधित सर्व पुरावे गोळा करण्याचे निर्देश भटिंडाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांना कोर्टाने द्यावेत, अशी मागणी मनिंदर सिंग यांनी केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपचे शिष्टमंडळ चंदिगडमध्ये राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहे. या शिष्टमंडळात पंजाबमधील भाजपचे प्रमुख नेते आहेत आणि प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा हे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चूक प्रकरणी भाजप नेते राज्यपालांना भेटत आहेत.

Leave a Reply