बकुळीची फुलं – भाग : २ – शुभांगी भडभडे

ही माझी आत्मकथा नाही . पण मनात असलेल्या गंधित आठवणी आहेत . त्या माझ्याच आहेत. पण आज जीवनाच्या सांध्यपर्वात मला क्षितिजावर अवखळपणे येणा-या कोमल किरणां सारख्या तरीही दूरस्थ वाटतात . हातात येत नाहीत , मनात मावत नाहीत. लहरींवर लहरी याव्यात तशा पुन्हा पुन्हा येत राहतात मनाच्या किना-यावर .
आठवते माझी डोंबिवली ची माझी जिल्हा परिषदेची शाळा. जिथे माझी आई शिक्षिका होती. मीही शिक्षिकेची मुलगी म्हणून स्वतः ला ग्रेट समजणारी होते . आम्हाला त्यावेळी तिसरी , चौथीत मोडी लिपी आणि सूत कताई हे विषय होते.
बरी असेन कदाचित अभ्यासात . पण कामचुकार जास्त होते . एकदा मास्तरांनी थोडा थोडा कापूस दिला . कापसातून कचरा आणि बिया काढायच्या , कापूस धनुकलीने पिंजायचा , आणि एका पाटीवर पसरून पेळू करायचे आणि टकळीवर सूत काढायचं . ही सारी करामत मला कधीच जमायची नाही . माझ्या दोन मैत्रिणी मला नेहमी मदत करत होत्या. पण नुकतंच भांडण झालं होतं. मोडी लिहायच्या बोरू वरून. बोरू म्हणजे सनकाडी पासून केलेली टोकदार लेखणी . तिने माझी , मी तिची ही लेखणी तोडली होती . केसही ओढले होते दोघींनी एकमेकींचे
आता मास्तरांनी दिलेल्या कापसाच्या ढीगाकडे मी पहात राहिले.
दोघींनी माझ्याकडे पाहिलं मी नव्हतं.. कसाबसा मी कामाला कचरा काढला . बिया काढल्या .पुढे काहीच करावसं वाटेना . सकाळी शाळेत येताना माझ्या घराजवळ असलेल्या आणि वर्गात असलेल्या मैत्रिणींशीही भांडण झालं होतं . शाळेच्या रस्त्यावर असलेल्या चिंचेच्या झाडाच्या ढोलीत मी पाटीवर लिहायच्या रंगीत लेखणी ठेवल्या होत्या . त्या खुप होत्या आमच्या तिघींची ती संपत्ती होती. त्या त्यांनी आपापसात वाटून घेतल्या होत्या. पण मानतच नव्हत्या. त्याही माझ्याशी बोलत नव्हत्या . मास्तर नेहमी प्रमाणे सूत काढायचं काम देऊन गेले होते . इतक्यात परतणार नव्हते. मी उठले आणि कापूस हातात घेतला आणि दुस-या मजल्याच्या खिडकीतून खाली अंगणात टाकला नेहमी प्रमाणे मी निर्धास्त होते . खरं तर छड्या मारता -या त्या मास्तरांना मला छडी मारण्याची हिंमत होणार नव्हती.आणि काही राहिलं म्हणून मास्तर परतले होते. त्यांच्या हातात कापूस होता .वर्गावर त्यांनी नजर फिरवली .आणि विचारलं ” कुणी टाकला कापूस ? माझ्या डोक्यावर पडला .कोण आहे बोला ?”
त्यांनी हातात छडी घेतली . कुणीही बोलत नव्हतं. मीही मनातून घाबरले होते . त्यांचा आवाज वर्गाला भेदून जात होता . “कुणी बोलणार नसेल तर प्रत्येकाला पाच पाच छड्या मिळतील .” तरीही कुणीही बोलत नव्हतं. ” मास्तर, मीच टाकला कापूस . ” त्यांना ते अगोदरच कळलं होतं. मी शांत मनाने हात पुढे केला .त्यांनी हातातली छडी टाकली . म्हणाले. “जिची आई शिक्षिका आहे . तिच्यावर अधिक जबाबदारी असते चांगलं वागण्याची. आईला वाईट वाटेल, तिला कुणी काही म्हणेल हे तुला आवडेल का आणि मी तुला शिक्षा केली तर तुझ्या आईला आवडेल का? नाही ना? चांगली व्यक्ती व्हायची असेल तर चांगलंच शिकावं बाळा , वाईट होतं सहज आहे पण चांगलं मनात येणं , चांगलं वागणं तर तुझ्यि हातात आहे ना ?”
मला गद् गदून रडू आलं. त्यांनी मला जवळ घेतलं . “आज कळणार नाही बाळा , मी सांगतो ते . जेव्हा कळेल तेव्हा मी असेन की नसेन माहित नाही .” त्यावेळी कळलं नाही . आज कळलं अनुभवातून. चांगलं होणं , लोकांनी चांगलं म्हणणं किती कठीण आहे ते.

शुभांगी भडभडे

Leave a Reply