संपादकीय संवाद – जीव धोक्यात घालून देवदर्शन का घ्यायचे?

काल काश्मिरातील वैष्णोदेवी मंदिरात गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविक चिरडून ठार झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक भाविक हे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी तेथे पोहोचले होते. माणूस देवदर्शनासाठी जातो तो आपले भले व्हावे म्हणून, मात्र देवाच्या दारी दर्शनाची वाट बघत असताना साक्षात मृत्यूने त्यांना गाठावे, ही बाब खरोखरी दुर्दैवी म्हणावी लागेल.
या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याइतपत गर्दी होण्याचे कारणही समोर आले आहे. नववर्षानिमित्त अनेक भाविक विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करतात्त, तशी गर्दी या मंदिरातही झाली होती. त्यातच ही दुर्घटना घडली. मुळात नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी मंदिरातच जाणे गरजेचे आहे काय? हा प्रश्न इथे निर्माण होतो. असे म्हणतात की, घरी बसूनही मनोभावे देवाची प्रार्थना केली तर तो देव पावतो. मग मंदिरात जाऊनच दर्शन घेण्याची गरज काय. मात्र आम्ही मंदिरात जाऊनच दर्शन घ्यायचे असा अट्टाहास करतो. त्यातून ते प्रकार घडतात. अश्या तीर्थस्थानांचे कधीतरी दर्शन घ्यावे असे वाटणे साहजिक आहे. मात्र त्यासाठी कोणताही दिवस चालतो, ज्या दिवशी गर्दी नसेल त्या दिवशी निवांत जाऊन देवदर्शन केले तरी देव पावतो. मग नववर्षाच्याच स्वागताला तिथे का जायचे? हा हट्ट काहीसा अनाठायी वाटत नाही का?
इथे आणखी एक मुद्दा समोर येतो, १ जानेवारी हे इंग्रजांनी दिलेले नववर्ष आहे. हिंदू संस्कृतीनुसार आपले नववर्ष वर्षप्रतिपदेला सुरु होते, त्यातही वैश्य समाजाचे लोक बलिप्रतिपदेपासून नवे वर्ष सुरु करतात. मग इंग्रजांच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी हिंदू देवदेवतांच्या दर्शनासाठी जाण्याची इतकी धडपड का करावी? या प्रश्नाचे उत्तरही आम्ही शोधायला हवे.
शेवटी एकच मुद्दा येतो देवदर्शन जरूर घ्यावे, मात्र त्या दर्शनाने आनंद मिळायला हवा, आपला जीव धोक्यात घालकून घेतलेले देवदर्शन काय कामाचे? याचाही विचार व्हायला हवा तेच आपल्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply