९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची बिनविरोध निवड

लातूर : २ जानेवारी – लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उदगीर येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या समारोपवेळी पुढील साहित्य संमेलन चार महिन्याच्या आत होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या बिनविरोध निवडीबद्दल भारत सासणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून यांचे मराठी साहित्यात अनमोल योगदान आहे. त्यांचा साहित्य क्षेत्रात मोठा योगदान आहे. शिवाय त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.
भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म दि. २७ मार्च, १९५१ रोजी जालना येथे झाला असून त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली आहे. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी सेवा केली आहे. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथा लेखक आहेत. नवकथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाज जीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे वाचकाला भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. बऱ्याचवेळा या कथांतून गंभीर, शोकाकुल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात.
काही कथांतून मुस्लिम संस्कृतीच्या छायेत जगणाऱ्या मराठवाड्यातील शहरांचे व व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतीके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती (फॅंटसी) अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो. माणसाला केंद्रबिंदू मानणाऱ्या व मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.

Leave a Reply