पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७४९६ बाधित तर ८९ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २२ एप्रिल – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप सतत वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज हजारोच्या संख्येने बाधित रुग्ण सापडत आहेत तर शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. नागपूर पाठोपाठ भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या आणि रोजचे होणारे मृत्यू वाढतच असल्याची चिन्हे आहे. नागपूर शहरात आज तब्बल ७४९६ नवीन बाधित रुग्ण आढळून आले तर ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर पाठोपाठ भंडारा जिल्ह्यात १११० बाधित तर ३४ रुग्णांचा मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात १७४१ बाधित तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्य शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांनंतरही कोरोना रुग्णवाढीत काहीच फरक पडलेला दिसत नाही. नागपूर शहरात गेल्या २४ तासात ७४८९ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ४०००९९ वर पोहोचली आहे.आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३०६७ रुग्ण ग्रामीण भागातील ४४२२ शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. आज ८९ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील एकूण मृतकांचा आकडा ७३०० वर पोहोचले आहेत. आजच्या मृतकांपैकी ३३ रुग्ण ग्रामीण भागातील ४९ शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.
नागपूर शहरात आज एकूण २६२१२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ;त्यात ७०८४ ग्रामीणमध्ये तर १९१२८ चाचण्या शहरात घेण्यात आल्या. गेल्या २४ तासात ६९८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३१६३९९ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.१० टक्क्यांवर गेले आहेत. सध्या शहरात ७७६२७ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात ३१४७७ ग्रामीण भागातील तर ४६१५० शहरातील आहेत.

Leave a Reply