संपादकीय संवाद – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत

आज ३१ डिसेंबर २०२१, आज २०२१ हे वर्ष संपते आहे. आज सायंकाळी अस्ताला जाणारा सूर्य २०२१ चा शेवटचा सूर्य असेल, उद्या सकाळी २०२२ च्या सूर्याचा उदय झालेला असेल. येणाऱ्या २०२२ या नववर्षाच्या पंचनामाचे वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि समाधान देणारे राहील हा आम्हाला विश्वास आहे.
२०२१ हे वर्ष फक्त भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक आव्हान ठरले होते. कोरोना नामक जागतिक महामारीच्या दुसऱ्या टप्प्याने समस्त जगताला वेठीस धरले होते, परिणामी जगभरात लाखोंना आपले जीव गमवावे लागले. अनेकांच्या जवळच्यांचे मृत्यू झालेले बघावे लागले. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेने आधीच जागतिक अर्थचक्र मंदावले होते, या दुसऱ्या फेऱ्याने हे अर्थचक्र पूर्णतः थांबते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जगभरातील जनसामान्यांनी धैर्याने या परिस्थितीला तोंड दिले.
भारतातही कोरोनाने थैमान घातले होते, यावेळी भारतीय नागरिकांनीही या संकटाचा हिमतीने आणि धैर्याने सामना केला. विशेष म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी या काळात कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढली. भारतीय उद्योजकांनी या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले. प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत लसीकरण मोहीम राबवली त्यामुळे बहुसंख्य नागरिकांना या लसीचे दोन्ही डोज देण्यात आले आहेत. अजूनही लसीकरण सुरूच आहे, आता लहान मुलांसाठीही लसीकरण सुरु झाले आहे. याच गतीने लसीकरण सुरु राहिले, तर येणाऱ्या वर्षात भारताने कोरोनमुक्तीकडे वाटचाल केलेली असेल हे नक्की.
कोरोनाने भारतातीलही अर्थचक्र पूर्णतः विस्कळीत झाले होते. मात्र सरकार आणि जनता यांनी या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. त्यामुळे भारताची व्यवस्था कोलमडली नाही, तर सुरळीत सुरु राहिली. या काळात विकासकामेही प्रचंड गतीने सुरु आहेत. हे एक सुचिन्हच म्हणावे लागेल.
भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते, ज्या गतीने भारतात विकासकामे सुरु आहेत, त्याच गतीने सुरु राहिल्यास पुढच्या काही वर्षात ते स्वप्न साकार होणे अशक्य नाही. त्यादृष्टीने प्रत्येक भारतीयाने कटिबद्ध व्हावे आणि येणाऱ्या २०२२ मध्ये नवी भरारी घ्यावी, याच शुभेच्छांसह या वर्षात आम्ही आपला निरोप घेत आहोत, आता आपण पुढच्या वर्षी नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आणि नव्या संकल्पनांसह भेटणार आहोत.

अविनाश पाठक

Leave a Reply