ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसचा नेता विधानसभा अध्यक्ष होऊ दिला नाही – किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

मुंबई : ३० डिसेंबर – विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. हे अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन वादळी ठरलं. यापैकी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं प्रकरण प्रचंड गाजलं. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारचा मानस होता. तर विरोधकांचा त्याला विरोध होता. पण विधानसभा कामकाज समितीने अखेर ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यास मंजूर केलं. भाजपने या निर्णयावर आक्षेप घेतला होता. भाजपकडून याबाबत शिफारसी केल्या गेल्या. पण समितीने गुप्त मतदान पद्धतीनेच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. संबंधित निवडणुकीचा प्रस्ताव आणि गुप्त मतदानाच्या निर्णयासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शिफारस करण्यात आली तेव्हा राज्यपालांनी गुप्त मतदान पद्धतीवर आक्षेप घेतला. याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. आता या संघर्षानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वेगळाच दावा केला आहे.
“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणताही नेता विधानसभेचा अध्यक्ष होऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची होती. त्यातून त्यांनी काँग्रेसची फसवणूक केली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पपलू केला. ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसचा नेता विधानसभा अध्यक्ष होऊ दिला नाही. तसेच राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला”, असा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरेंना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कुणी नेता विधानसभेचा अध्यक्ष बनू नये म्हणून त्यांनी दोघांनी मिळून काँग्रेस नेते राहुल गांधींचं पपलू केलं. महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत, भाजपकडे 105, त्यामुळे गुप्त मतदान झालं असतं तर काय फरक पडलं असतं? काँग्रेसचा कोणताही नेता अध्यक्ष होऊ नये म्हणून आवाजी मतदान पद्धतीचं नाटक केलं. राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न आणि काँग्रेसचा अध्यक्ष ठाकरे-पवारांनी होऊ दिला नाही. ही हकीकत आहे”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Leave a Reply