प्रवीण पोटे यांच्या कॉलेजमधील गेटवर रंगकाम करतांना ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अमरावती : २९ डिसेंबर – माजी राज्यमंत्री व भाजपचे आमदार प्रविण पोटे यांच्या अमरावती येथील पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेटवर रंगकाम करत असताना विजेचा शॉक लागल्याने कॉलेजच्या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कॉलेजमधील प्रवेशद्वाराचे रंगकाम करण्यासाठी कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधीलच कर्मचाऱ्यांना हे काम सांगितलं होतं. हे कर्मचारी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर रंगरोटी करत होते. या रंगरंगोटीसाठी लोखंडी शिडीवर सर्व जण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का लागल्याने चारही जणांना जोरदार शॉक लागला. विजेचा झटका इतका जबर होता की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. एका कर्मचाऱ्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
या घटनेनंतर घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. तर आता हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी येत आहे. अक्षय सावरकर वय २६वर्ष, प्रशांत शेलोरकर, वय ३१वर्ष, संजय दंडनाईक वय ४५ वर्ष व गोकुळ वाघ वय २९वर्ष असे, चारही मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे, ते चौघेही याच कॉलेज मध्ये शिपाई पदावर कार्यरत होते.

Leave a Reply