भंडारा : २८ डिसेंबर – भंडाऱ्याहून तुमसरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या मॅक्स गाडीला मोहाडीजवळील पारडी फाट्यावर ऑटो आडवा आल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या एस.टी. चा संप सुरू असल्याने खासगी प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. खाजगी मॅक्स, सुमो इत्यादी प्रकारच्या वाहनात जनावरा सारखे प्रवासी कोंबले जातात. चालकाच्या बाजूलाही चार, पाच व्यक्ती बसवले जात असल्याने चालकाला वाहन चालविण्यात असुविधा होते, तरी पैश्याच्या लोभापायी हे सर्व बिनबोभाट सुरू आहे. तसेच वाहनांची गतीही अर्मयादित राहत असल्याने असे अपघात घडत आहेत. आज दुपारी १२ वाजेदरम्यान येथील पारडी फाट्या समोरुन ही प्रवासी गाडी एमएच-३५/इ- १३५३ जात असताना अचानक ऑटो चालकाने आपला ऑटो रस्त्यावरून विरुद्ध दिशेने वळविल्याने त्याला वाचविण्यासाठी मॅक्स वाहनाच्या चालकाचा संतुलन बिघडला व ही मॅक्स गाडी एका झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे समोर बसलेल्या प्रवास्यांना गंभीर दुखापत झाली.
आजूबाजूला असलेल्या आदर्श बडवाईक, मनीष गायधने, प्रफुल्ल सोनूलकर, विजय मलेवार, पडोळे आदी लोकांनी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले. जखमी मध्ये वामन पराते (५७) भंडारा, लता बांते(५१), अनिता सार्वे(४७), विकास न्यायमूर्ती(१७), हेमंत बोरघरे(३२), सर्व राहणार भंडारा, प्रमिला सार्वे (५१) रा. वडेगाव, सुभाष दमाहे(५0) रा. बपेरा(आंबागड) व मॅक्स चालक विकास पडोळे (३२) रा. तुमसर यांचा समावेश आहे. मागे बसलेल्या पाच, सहा प्रवाश्यांना किरकोळ जखमा झाल्याने ते आपल्या घरी परतले. तर प्रभाकर हेडाऊ(६५) रा. मोहाडी यांचा भंडारा रुग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाला. डॉ. प्रताप गोंधुळे, डॉ. शिल्पा टांगले, परिचारिका सना पठाण, आनंद गुणेरीया यांनी तात्काळ वैद्यकीय सेवा पुरविली. तपास पोनि. राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि. राजेंद्र गायकवाड, पोह.राजेश गजभिये, दुर्योधन भुरे, गोविंद गुट्टे, प्रभाकर बारापात्रे हे करीत आहेत.