केवळ ४० ते ५० वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव – दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

भोपाळ : २६ डिसेंबर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. जीन्स परिधान करणाऱ्या मुलींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. केवळ ४० ते ५० वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे, असं विधान दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भोपाळमध्ये जन जागरण अबियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. जीन्स परिधान करणाऱ्या आणि मोबाईल बाळगणाऱ्या मुली मोदींमुळे प्रभावित नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलाच मोदींवर प्रभावित आहेत, असं सांगतानाच 2024मध्ये मोदी पुन्हा विजयी झाल्यास सर्वात आधी देशाचं संविधान बदललं जाईल. जे काही आरक्षण मिळतंय तेही बंद केलं जाईल. कारण भाजप रशिया आणि चीनचं मॉडल फॉलो करत आहेत, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.
हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही हे स्वत: सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. तसेच गाय आपली माता होऊच शकत नाही, असंही सावरकरांनी म्हटलं आहे. जी गाय आपल्याच मलमूत्रात पहूडलेली असते ती आपली माता कशी काय असू शकते? असा सवालही सावरकरांनी केला आहे. एवढेच नव्हे तर गोमांस खाण्यात काहीही गैर नाही. आज भाजप आणि संघ ज्या सावरकरांना आदर्श मानतो त्यांनीच हे सांगितलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी मध्यप्रदेशातील भाजप सरकारवरही हल्ला चढवला. मध्यप्रदेशात सर्वाधिक बजरंग दलाचे गुंड आहेत. या गुंडांना पोलिसांची साथ आहे, अशी टीका त्यांनी केली. एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांना मारलं गेलं. ज्या व्यक्तीने हत्या केली, त्याला तुम्ही नोकरी दिली. राज्यातील सरकार आणि पोलीस बजरंग दलाला वाचवत आहे. हे मोदींचं सरकार आहे. शिवराज मामूंची वाळू माफियांची गँग आहे. आता त्यांच्याविरोधात लढलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply