धार्मिक कार्यक्रमात अनियंत्रित डीजे वाहन घुसले भाविकांच्या गर्दीत, १३ भाविक गंभीर जखमी

छिंदवाडा : २६ डिसेंबर – धार्मिक कार्यक्रम सुरू असताना एक अनियंत्रित डीजे वाहन थेट भाविकांच्या गर्दीत घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर डीजे टेम्पो समोर असणाऱ्या प्रत्येक भाविकाला चिरडत पुढे गेला आहे. या दुर्घटनेत एकूण १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा काळजाचा ठोका चुकवणारा लाईव्ह व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.
संबंधित घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. याठिकाणी शेकडो भाविकांनी एकत्र येत जाम सावली येथील हनुमान मंदिरात जाण्यासाठी पदयात्रा काढली होती. यावेळी या भाविकांच्या पाठीमागे डीजे लावलेला मिनी ट्रक येत होता. भक्तित तल्लीन झालेले अनेक भाविक डीजेच्या तालावर डान्स करण्यात दंग होते. यावेळी अचानक डीजे लावलेल्या मिनी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि हा ट्रक समोर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चिरडत पुढे गेला.
अचानक घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांची धांदल उडाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण सैरावैरा पळू लागले. या दुर्दैवी घटनेत एकूण १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर यातील ३ भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना घडताच संबंधित जखमींना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली आहे.
या दुर्घटनेनंतर संतापलेल्या भाविकांनी डीजे वाहनाची तोडफोड केली आहे. एसडीओपी एसपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली. शनिवार असल्याने सौसर येथील जाम सावली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी ब्रेक फेल झाल्याने डीजे वाहनाने अनेकांना चिरडलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

Leave a Reply