चारित्र्यावर संशय घेऊन पतीने आवळला पत्नीचा गळा

भंडारा : २३ डिसेंबर – चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा शहरातील मेंढा परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून आरोपी पती फरार झाला आहे. बक्षिता विलास मेश्राम (वय २७) रा. नेहरू वॉर्ड, मेंढा, भंडारा असे मृत महिलेचे नाव आहे.
बक्षिताचा पती विलास धनराज मेश्राम (वय ३५) रा. पांढराबोडी ता. भंडारा हा ट्रकचालक आहे. तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन तिच्यासोबत वाद घालत होता. या त्रासाला कंटाळून बक्षिता आपल्या मुलांना घेऊन माहेर असलेल्या मेंढा येथे भाड्याने राहत होती.
विलास मेश्राम हा बक्षिताच्या घरी आला. त्या रात्री त्याने तिथेच मुक्काम केला. दरम्यान, रात्रीच्या सुमारास त्याने साडीने बक्षिताचा गळा आवळून खून करून पसार झाला. बक्षिता खाली पडून होती. त्यामुळे, तिच्या मुलांनी सकाळी ही बाब आपल्या मामाला सांगितली. मामा क्रिष्णा चापरे याने घरी जाऊन पाहिले असता बक्षिता मृतावस्थेत पडून होती. याप्रकरणी क्रिष्णा चापरे याने भंडारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून भंडारा पोलिसांनी आरोपी विलास मेश्राम विरुद्ध भादंविच्या कलम ३0२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक केदार करीत आहेत.

Leave a Reply