पेपरफुटी प्रकणाची तार कुठपर्यंत? त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत – नाना पटोले

मुंबई : २२ डिसेंबर – राज्यातील विविध भरती परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या सर्व घोटळ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटीच्या चर्चेला वेळ द्या अशी मागणी केली. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले.
“न्यासा नावाच्या कंपनीला २१ जानेवारी २०२१ ला अपात्र ठरवण्यात आले आहे. ४ मार्च रोजी पुन्हा याच कंपनीला पात्र ठरवण्यात आले. पुन्हा त्यांनाच काम देण्याची आवश्यकता काय होती? चार कंपन्यांना डावलून न्यासा कंपनीला संपूर्ण काम देण्यात आले. त्यामाध्यमातून आधी आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आणि मग म्हाडाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला. जीए सॉफ्टवेअर कंपनीला देखील अपात्र ठरवले होते त्यानंतर त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा केला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
“देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या मागणीवर चर्चा व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण हे घोटाळे कुठून सुरु झाले आणि याचे तार कुठपर्यंत जोडले गेले आहेत याची माहिती राज्याच्या जनतेपर्यंत गेलीच पाहिजे. ज्यामुळे तरुणांची जी गैरसोई झाली याचं कोणीही समर्थन करु शकत नाही. शासनामार्फत काय कारवाई केली जात आहे हे जनतेला कळले पाहिजे. या प्रकणाची तार कुठपर्यंत आहेत त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत,” असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अपेक्षेप्रमाणे भाजपाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकार विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यामधे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे आमदार सहभागी झाले होते. आरोग्य विभाग व म्हाडा भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केला जात असल्याबद्द्लही भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Leave a Reply