अजित पवारांना मुख्यमंत्री बनवून मुख्यमंत्र्यांनी आराम करावा – प्रसाद लाड

मुंबई : २२ डिसेंबर – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यावरुन विऱोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका करण्याचं तसंच मुख्यमंत्र्यांना पर्याय उभा करण्याचं सुचवलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही मुख्यमंत्रिपदाचा कारभार दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावा अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पसंती दर्शवली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीविषयी बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले, आता ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली, यावरुन लक्षात येत आहे की मुख्यमंत्री काय अधिवेशनाला येत नाहीत. मला असं म्हणायचं आहे की आम्ही, आमचे सर्व नेते पहिल्या दिवसापासून म्हणतोय की मुख्यमंत्र्यांनी लवकर बरे व्हावे. आम्ही प्रार्थना देखील करत आहोत की त्यांनी लवकर बरं व्हावं आणि करत राहणार आहोत. पण राज्याचा कारभार गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अधांतरी आहे, कोणताही महत्त्वाचा निर्णय होत नाही. माझं असं मत आहे मुख्यमंत्र्यांनी थोडा आराम करा आणि मुख्यमंत्रिपदाचा कारभार आदित्य ठाकरे किंवा अजित पवार यांच्याकडे द्यावी.
अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाच्या कारभारासाठी पसंती दर्शवताना प्रसाद लाड म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा कारभार कोणाला द्यायला हवा हा खरं तर मुख्यमंत्र्यांचाच प्रश्न आहे. पण दादांचा अनुभव लक्षात घेता तसंच उपमुख्यमंत्री म्हणून टेक्निकली तो त्यांच्याकडेच द्यायला हवा. पण जर त्यांच्या तीन तिघाडीत त्यांना मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे द्यायचं नसेल, तर निश्चितपणे त्यांनी तो आदित्य ठाकरेंकडे द्यावा किंवा एकनाथ शिंदेंकडे द्यावा. जेणेकरून राज्याचा कारभार थांबणार नाही.

Leave a Reply