तृणमूल काँग्रेस स्पर्धेत कुठेच नाही – गोव्यात अरविंद केजरीवाल यांचा ममतादीदींना टोला

पणजी : २२ डिसेंबर – गोव्यात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी तृणमूल काँग्रेस स्पर्धेत कुठेच नसल्याचं म्हटलं आहे. पणजी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना मला वाटतं तुम्ही लोक तृणमूल काँग्रेसला जरा जास्तच महत्व देत आहात असं सांगत टोला लगावला.
“मला वाटतं तुम्ही लोक तृणमूल काँग्रेसला जास्तच महत्व देत आहात. त्यांच्याकडे सध्या १ टक्के मतंही नाहीत. फक्त तीन महिन्यांपूर्वी ते गोव्यात आले आहेत. लोकशाहीत असं चालत नाही. तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतात, लोकांमध्ये काम करावं लागतं,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी मतदारांना आवाहन करताना गोव्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ असं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी दिल्लीमधील आपल्या कामाचा उल्लेख केला. “आम आदमी पक्षाने दिल्लीमधील भ्रष्टाचार संपवला,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी गोव्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधत अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं म्हटलं. “काँग्रेस, भाजपा सर्वच पक्ष भ्रष्टाचारी असल्याने गोव्यातील लोकांनी काही पर्याय नव्हता. पण आता आम आदमीसाऱखा स्वच्छ पक्ष आला आहे, त्याला संधी द्या,” असं आवाहन केजरीवालांनी केलं.
४० सदस्यांच्या विधानसभेसाठी गोव्यात दोन महिन्यात निवडणूक होणार आहे. आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस गोव्यातील निवडणुकीत उतरल्याने यावेळी भाजपाला मोठ्या आव्हानाचा सामोरं करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या गोव्यात भाजपाचे १७ आमदार असून महाराष्ट्र गोमंतक पार्टी, गोवा फॉरवर्ड पाटीचे विजय सरदेसाई आणि तीन अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पाटीचे प्रत्येकी तीन आमदार असून काँग्रेसकडे १५ आमदार आहेत.

Leave a Reply