लग्न कधी करायचे हे सांगणारे तुम्ही कोण? – इम्तियाज जलील यांचा पंतप्रधानांना सवाल

नवी दिल्ली : २० डिसेंबर – मुलींचं लग्नासाठीचं वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यामुळे आता यासंदर्भातलं विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावरून सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, मग लग्न कधी करायचे हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
इम्तियाज जलील म्हणाले, “मला मोदींना हा विचारायचं आहे की मुलींच्या लग्नासाठीचं वय वाढवून काय साध्य करणार आहेत? १८ वर्षांचं झाल्यावर मी देशाचा पंतप्रधान कोण होणार हे निवडू शकतो. आमदार-खासदार निवडू शकतो. १८ वर्षाचं झाल्यावर मी करारावर स्वाक्षरी करू शकतो. व्यवसाय सुरू करू शकतो. असं असताना केवळ लग्नासाठी हे विधेयक आणणं कितपत योग्य आहे? सरकारचा यामागे काय तर्क आहे हे त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे.”
सरकारला आपल्या तरूण पीढित किती सामर्थ्य आहे, किती ऊर्जा आहे हे माहिती नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही १८ वर्षांचं झाल्यावर सर्व परवानग्या देत आहात मग लग्न कधी करायचं हे तुम्ही कोण सांगणारे?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला.
दरम्यान, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला होता. मोदींना नेमकी लग्नाबद्दल अडचण काय आहे? असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता.

Leave a Reply